“५ हजारांचा हप्ता दे, नाहीतर…” ग्राम महसूल अधिकाऱ्याला धमकी, दोन दिवसांत दुसरा गुन्हा नान्नज हादरले!
नान्नज येथे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला धमकावत दरमहा ५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ, धमकी, शासकीय कागदपत्रांची फेकाफेक तसेच धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या FIR नुसार, ही घटना १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास नान्नज येथील सजामध्ये घडली. या प्रकरणी २१ ऑगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जामखेड पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०५७९/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी हे सन २०२३ पासून नान्नज येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १९ ऑगस्ट रोजी ते कार्यालयीन शासकीय कामकाज करत असताना महादेव अरुण साठे, विशाल साठे, अलोक राजू साठे आणि आकाश राजू साठे हे चौघे कार्यालयात आले.
फिर्यादीच्या आरोपानुसार, आरोपींनी ‘नान्नज येथे काम करायचे असेल तर दर महिन्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच माहिती अधिकाराचे अर्ज देण्याची आणि खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याचवेळी महादेव अरुण साठे याने नारळ तोडण्याचा कोयता दाखवून पैसे देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. या धमकीमुळे घाबरून आपण ५ हजार रुपये दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपींनी कार्यालयातील शासकीय दस्तऐवज ओढून घेत इतरत्र फेकून दिले. तसेच शासकीय कर्तव्य बजावत असताना काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त करत भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित चौघांना जबाबदार धरावे, अशी मागणीही फिर्यादीने केली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, ३०८(६), ३०८(७), ३५२ आणि ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित सरजेराव मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पैशांची मागणी, धमकी, कथित धक्काबुक्की, शासकीय कागदपत्रांची फेकाफेक तसेच या घटनेमागील अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. दरम्यान, FIR मध्ये नमूद करण्यात आलेले आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित आहेत. या आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून, प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.