जामखेड न्युज – – – – – –
पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध; जिल्हास्तरीय अधिवेशन लवकरच – वसंत लोढा
.

पतसंस्था चळवळीसमोरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध असून, जिल्ह्यातील पतसंस्थांचे अधिवेशन लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पतसंस्था फेडरेशनचे नाशिक विभागीय अध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.

जामखेड येथे नागरी, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांच्या चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी (दि. १३) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक विभागातील नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तसेच कर्जत-जामखेड तालुका पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष वसंत लोढा, तालुका अध्यक्ष तथा ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे, रेणुका माता मल्टिस्टेटचे चेअरमन व अर्थतज्ज्ञ प्रशांत भालेराव, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जामखेडचे तालुका उपनिबंधक दिलीप तिजोरे, कर्जतचे उपनिबंधक तान्हाजी टेकाळे, यशवंत नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कोठारी, मराठा सेवा पतसंस्थेचे उपाध्यक्ष उदय अनभुले, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले तसेच सहनिबंधक तान्हाजी कवडे, प्रशांत खोपटीकर आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना वसंत लोढा म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ राज्यात चांगली आहे. मात्र, काही पतसंस्था अडचणीत असल्याने त्याचा त्रास चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या पतसंस्थांनाही सहन करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच पतसंस्थांबाबत लागू होणाऱ्या नवीन नियमांची माहिती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्हाभर कार्यशाळा घेण्यात येत आहेत.शासनाकडून अनेक नवीन नियम लागू केले जात आहेत.




