Sunday, August 9, 2026
Home ताज्या बातम्या नान्नज उपोषणाचा तिसरा दिवस; गाव कडकडीत बंद, रस्ता रोकोचा इशारा ...

नान्नज उपोषणाचा तिसरा दिवस; गाव कडकडीत बंद, रस्ता रोकोचा इशारा महिलांचा उद्या कॅडल मार्च; बसस्थानक, राष्ट्रीयीकृत बँक, रस्ते व बंधाऱ्यांसाठी आंदोलन तीव्र होणार

0
2

जामखेड न्युज – – – – – 

नान्नज उपोषणाचा तिसरा दिवस; गाव कडकडीत बंद, रस्ता रोकोचा इशारा

महिलांचा उद्या कॅडल मार्च; बसस्थानक, राष्ट्रीयीकृत बँक, रस्ते व बंधाऱ्यांसाठी आंदोलन तीव्र होणार

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नान्नज ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी आज कडकडीत गाव बंद पाळला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवून उपोषणस्थळी उपस्थित राहत जाहीर पाठिंबा दिला. गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने नान्नजमधील जनभावना प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे.

नान्नजच्या विकासासाठी सुसज्ज बसस्थानक, राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तसेच शेतकऱ्यांसाठी बंधारे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या कोणत्याही एका पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या हितासाठी नसून नान्नज व परिसरातील सर्वसामान्य नागरिक, महिला, मुली, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, वृद्ध आणि तरुणांच्या भविष्यासाठी असल्याचे उपोषणकर्ते शहाजीराजे भोसले यांनी सांगितले.


बसस्थानकासाठी आणखी दहा गुंठे जागेची मागणी एसटी बसस्थानकाच्या प्रश्नाबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू असून, जुन्या दहा गुंठे जागेसोबत आणखी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर नान्नज येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले.

बसस्थानकाचा प्रश्न विशेषतः मुली व विद्यार्थीनींच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मोठी बाजारपेठ असूनही नान्नजमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्याने शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे एसबीआय किंवा बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही उपोषणकर्ते शहाजीराजे भोसले म्हणाले, “मी काँग्रेस पक्षाचा असलो तरी हे उपोषण कोणत्याही पक्षासाठी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आहे. नान्नजच्या विकासासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी आणि ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही.”

आजच्या उपोषणस्थळी एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित झाले, मात्र तहसीलदार, बँक, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दूरसंचार विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी आले नसल्याची माहिती भोसले यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाने सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना पाठवून प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

उद्या महिलांचा कॅडल मार्च; रास्ता रोकोचा इशारा

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सायंकाळी महिलांच्या वतीने कॅडल मार्च काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने जामखेड–करमाळा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत, “गावच्या विकासासाठी हे उपोषण सुरू आहे. बसस्थानक, बँक आणि चांगले रस्ते या नान्नजच्या अत्यावश्यक गरजा आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे,” असे सांगितले.
(दगडू आण्णा पवार पाटील)

अत्यावश्यक सेवा सुरू; शांततेत गाव बंद
गाव बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, औषध दुकाने व दूध विक्री सुरू ठेवण्यात आली. इतर व्यापाऱ्यांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दिला. नागरिकांनी शांततेत, संयमाने आणि लोकशाही मार्गाने बंद पाळला.

दरम्यान, गाव बंदच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस कॉन्स्टेबल काळाणे, जाधव यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गाव बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.नान्नजच्या विविध मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!