जामखेड न्युज – – – –
जामखेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; चार ट्रॅक्टरसह १६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरखेड शिवारातील कारवाई; चार आरोपींवर गुन्हा दाखल

जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत चार ट्रॅक्टर-ट्रॉलींसह सुमारे १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक सुमनकुमार सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार थिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस नाईक रविंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दळवी व ज्ञानेश्वर बेलेकर यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पिंपरखेड ते बावी जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरखेड शिवारात सापळा रचण्यात आला. त्यावेळी चार ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान चालकांनी आपली नावे
शाकीर हुसेन शेख (वय ३५, रा. पिंपरखेड),
अर्जुन बळभीम लबडे (वय ४२, रा. पिंपरखेड),
रामदास नवनाथ कदम (वय ३५, rा. पिंपरखेड),
आनंद सर्जेराव कदम (वय ३२, रा. पिंपरखेड)
अशी सांगितली.
पोलिसांनी आरोपींकडून चार ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यामधील ४ ब्रास वाळूसह एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.





