जामखेड न्युज – – – – – –
ल. ना. होशिंग विद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी
प्राचार्य बी. ए. पारखे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवेचा, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा व स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वर्तमानपत्रांद्वारे टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जहाल लेखन करून जनजागृती केली. त्यांच्या राष्ट्रवादी विचारांमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावून मंडाले (बर्मा) येथील तुरुंगात पाठविले. याच कारावासात त्यांनी जगप्रसिद्ध ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची निर्मिती केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्राचार्य पारखे यांनी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे मूळ नाव चंद्रशेखर तिवारी असून, न्यायालयात स्वतःचे नाव ‘आझाद’ असे सांगितल्यापासून ते चंद्रशेखर आझाद या नावानेच ओळखले जाऊ लागले. त्यांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारी गटात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील विविध क्रांतिकारी घटनांचा उल्लेख करताना चितगाव शस्त्रागार (कट) यासारख्या घटनांनी भारतीय तरुणांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनातून राष्ट्रप्रेम, त्याग, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्राचार्य बी ए पारखे, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, उमाकांत कुलकर्णी, मुकूंद राऊत, हनुमंत वराट, स्वप्निल जाधव, बापू जरे, विजय क्षीरसागर, बाबासाहेब समुद्र, स्वप्नाली घाडगे,
कारंडे आर एस, हंगे एस बी,
जाधव एम जे, सोळंकी एल एम, दराडे एस बी, घायतडक एस वाय, भोंडवे एस व्ही, अल्हाट व्ही एस, लंघे पी.टी यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


