दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी जामखेड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करतौं आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रहार जनशक्ती पक्ष, काँग्रेस, आदिवासी संघटना, लोकाधिकार आंदोलन, मुस्लिम पंच कमिटी आदी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तहसील कार्यालय परिसरात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच देशभरातील पालक व विद्यार्थ्यांची भावना आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे नेमके कोण होते, ते कोठून आले, त्यांच्या हातात दांडके कसे आले, वाहनांमध्ये दगड कोठून आणले गेले, याची सखोल चौकशी करून संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
मोर्चाच्या समारोपावेळी दिल्लीतील आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोठारी, मुस्लिम पंच कमिटीचे अझहरभाई काझी, संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार, मनसेचे प्रदीप टाफरे, शिवसेनेचे ॲड. मयूर डोके, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युम सुभेदार, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, आदिवासी नेते प्रकाश काळे, लोकाधिकार आंदोलनाचे बापूसाहेब ओव्होळ, इस्माईल सय्यद, विकी सदाफुले, प्रा. लक्ष्मण ढेपे, रमेश आजबे, माजीद कुरेशी, रवि शेळके, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, मुकुंद घायतडक, रंजित मेघडंबर, नगरसेविका संगीता भालेराव, नगरसेवक वसिम सय्यद, प्रशांत राळेभात, प्रा. कुंडल राळेभात, ॲड. हर्षल डोके, जुबेर शेख, सरपंच बाळासाहेब खैरे, बापूसाहेब कार्ले, मच्छिंद्र जाधव, सचिन शिंदे, गणेश हगवणे, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, हरिभाऊ आजबे, प्रा. धनंजय भोसले, स्वप्निल खाडे, रजनी औटी, सुरज भालेराव, ऋषिकेश गायकवाड, सागर कांबळे, विकी पिंपळे, विशाल जाधव, पिंटू जाधव, नितीन जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट :
‘आय सपोर्ट सोनम वांगचूक सर… कारण माझं भविष्य धोक्यात आहे’ मोर्चादरम्यान एका चिमुकल्या अबिराने हातात “I Support Sonam Wangchuk Sir… कारण माझं भविष्य धोक्यात आहे” असा फलक घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या भविष्याबाबतची चिंता व्यक्त करत तिने शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि न्यायासाठीचा लढा याकडे गांभीर्याने पाहण्याचा संदेश दिला. न्याय आणि हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी वय अडथळा ठरत नाही, तर सुजाण नागरिक म्हणून सजग राहणे गरजेचे आहे, असा प्रभावी संदेश या फलकातून देण्यात आला.