जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाज सज्ज! १६ सप्टेंबरला जामखेड मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या संघर्षयोद्ध्याच्या स्वागताची जय्यत तयारी, चौकाचौकात स्वागत कमानी, अन्न-पाण्याची व्यवस्था
जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाज सज्ज!
१६ सप्टेंबरला जामखेड मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या संघर्षयोद्ध्याच्या स्वागताची जय्यत तयारी, चौकाचौकात स्वागत कमानी, अन्न-पाण्याची व्यवस्था
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाची भूमिका कायम ठेवणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जामखेडमार्गे मुंबईकडे प्रवास होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी जामखेड शहर व तालुक्यातील मराठा समाजाने कंबर कसली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार, १३ सप्टेंबर रोजी अखंड मराठा समाज, जामखेडच्या वतीने नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या स्वागतासह त्यांच्यासोबत मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.
जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शहर व तालुक्यातील प्रमुख चौकांमध्ये स्वागत कमानी आणि मोठे फलक उभारण्यात येणार आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्किटे, नाश्ता व खाद्यपदार्थांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मोहा फाटा ते जामखेड शहरापर्यंत स्वागताची तयारी मनोज जरांगे पाटील हे १५ सप्टेंबर रोजी रात्री बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी राहणार असून, १६ सप्टेंबर रोजी सकाळी जामखेडमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
त्यांच्या स्वागतासाठी मोहा, रेडेवाडी व परिसरातील गावांच्या वतीने मोहा फाटा येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. त्यानंतर साकत फाटा येथे धोत्री, सावरगाव, साकत यासह परिसरातील मराठा बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पाणी बॉटल, बिस्किटे आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चौकाचौकात स्वागत; वातावरण भगवेमय होणार जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात आगमन झाल्यानंतर विविध ठिकाणी मराठा बांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामध्ये मार्केट कमिटी, विश्वक्रांती चौक, बीड कॉर्नर, जयहिंद चौक, खर्डा चौक, शंभुराजे कुस्ती संकुल, पंचायत समिती कार्यालयासमोर, एस.टी. बसस्थानक, नगर रोड, पंचदेवालय चौक तसेच पाटोदा-अरणगाव या ठिकाणांचा समावेश आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत कमानी व फलक उभारण्याची तयारी सुरू असून, जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जामखेड शहर व तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी विविध ठिकाणी पाणी, नाश्ता व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी जामखेडमार्गे जाणाऱ्या मराठा बांधवांच्या स्वागतासाठी शहर व तालुका सज्ज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रविवारी झालेल्या नियोजन बैठकीस जामखेड तालुक्यातील विविध गावांतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत स्वागत व्यवस्था, अन्न-पाणी वाटप, कमानी व फलक तसेच इतर आवश्यक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
चौकट
मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी ज्या नागरिकांना पाणी, खाद्यपदार्थ किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात मदत करायची असेल, त्यांनी अखंड मराठा समाज, जामखेडशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.