जामखेड महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न; ७६ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी
शासनाच्या रोजगार संधीचा लाभ घ्यावा – अमित चिंतामणी
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. उद्धवबापू देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर येथील प्र. सहाय्यक आयुक्त मा. श्री. योगेश ना. उगले उपस्थित होते. यावेळी रोजगार मेळावा समितीचे समन्वयक मा. श्री. अमोल घोलप, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मा. श्री. अमितशेठ चिंतामणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. केळकर, प्राचार्य विकी घायतडक, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. एस. एन. गाडेकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एम. गोलेकर, विविध नामांकित कंपन्यांचे एच.आर. प्रतिनिधी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकात मा. श्री. योगेश ना. उगले यांनी रोजगार मेळाव्याची उद्दिष्टे आणि शासनाच्या रोजगाराभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. जी. डी. केळकर यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घेत स्वतःचे करिअर सक्षम करण्याचे आवाहन केले.
मार्गदर्शनपर भाषणात मा. श्री. अमोल घोलप यांनी शासनाच्या विविध कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता योजनांची सविस्तर माहिती दिली. बदलत्या रोजगार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्यवृद्धी, व्यक्तिमत्त्व विकास आणि तांत्रिक ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मा. श्री. अमितशेठ चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शासन रोजगाराच्या संधी युवकांच्या दारापर्यंत घेऊन आले आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासातही सक्रिय योगदान द्यावे.”.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. उद्धवबापू देशमुख यांनी युवकांनी काळाच्या गरजा ओळखून आधुनिक कौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन केले. रोजगार मेळाव्यांसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राशी थेट जोडण्याचे काम करतात आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा देतात, असे त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी रोजगार, करिअरच्या संधी आणि उद्योजकतेविषयी विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपलब्ध रोजगार संधी, आवश्यक पात्रता आणि निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
या रोजगार मेळाव्यात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी तब्बल ७६ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलमार्फत यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वर्षी झालेली ७६ विद्यार्थ्यांची निवड ही महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रभावी प्लेसमेंट व्यवस्थेची साक्ष देणारी असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. बी. तरटे व प्रा. एस. डी. मोहळकर यांनी केले, तर आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. एस. एन. गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयाच्या सी. व्ही. रमण सभागृहात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.