सरसकट कर्जमाफीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा २९ जूनला मराठवाड्यात तीव्र शेतकरी आंदोलन आ. रोहित पवार यांचा सरकारला इशारा – “आश्वासन पाळले नाही तर रस्त्यावर उतरू”
सरसकट कर्जमाफीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा २९ जूनला मराठवाड्यात तीव्र शेतकरी आंदोलन
आ. रोहित पवार यांचा सरकारला इशारा – “आश्वासन पाळले नाही तर रस्त्यावर उतरू”
विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आ. रोहित पवार यांनी पंढरपूरच्या पवित्र भूमीत केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत कर्जमाफीच्या प्रश्नावर विधानसभेत सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
काय घडले होते पंढरपुरात? पंढरपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आ. रोहित पवार यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा घडवून दिली होती. त्यावेळी अधिवेशनापूर्वी या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र अद्यापही संबंधित बैठक आयोजित करण्यात आलेली नसल्याचे आ. रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
विधानसभा अध्यक्षांकडे मागणी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात आ. पवार यांनी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटविण्याबाबत व सरसकट कर्जमाफी लागू करण्याबाबत सभागृहात व्यापक व कालबद्ध चर्चा घडवून आणण्याची विनंती केली.
“अवकाळी, दुष्काळ, हमीभावाचा अभाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. २०१७ नंतर झालेली कर्जमाफी अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. अनेक अटींमुळे ६०% पेक्षा जास्त शेतकरी वंचित राहिले. आता सरकारने तातडीने विनाअट सरसकट कर्जमाफी जाहीर करावी,” अशी मागणी आ. पवार यांनी केली.
२९ जूनचा अल्टिमेटम तसेच शासनाने येत्या २८ जूनपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २९ जून २०२६ रोजी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात तीव्र शेतकरी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला आहे.
“सरकारने शब्द पाळला नाही तर पंढरपूरपेक्षा मोठे आंदोलन मराठवाड्यात उभे करू. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असे पवार म्हणाले.
शेतकरी संघटनांचा पाठिंबा दरम्यान, विविध शेतकरी संघटनांनी आ. रोहित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून २९ जूनच्या आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे.