जामखेड न्युज – – – – –
इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा
“आर्ट ऑफ लिव्हिंग, पोलीस, ग्रामपंचायत व लोकमतच्या संयुक्त विद्यमाने आरोग्याचा जागर”

शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खर्डा येथे दैनिक लोकमत, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार खर्डा, खर्डा पोलीस स्टेशन, खर्डा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री रविशंकर यांच्या प्रतिमेचे पूजन
कार्यक्रमाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक संतोष थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक वैजनाथ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण गदादे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

शाळेच्या मैदानावर योग-साधना
रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या भव्य मैदानावर शाळेतील विद्यार्थी, खर्डा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद व आरोग्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, तुळशीदास गोपाळघरे व सेवानिवृत्त सैनिक बबन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. ‘ताडासन, वृक्षासन, भुजंगासन’ यासह ‘अनुलोम-विलोम, कपालभाती’ प्राणायामाचे धडे देण्यात आले.

“योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा”
यावेळी सपोनि उज्वलसिंह राजपूत म्हणाले, “ताणतणावाच्या काळात योग हीच खरी औषध आहे. पोलीस दलालाही योगाची गरज आहे.” तर मुख्याध्यापक लक्ष्मण गदादे यांनी, “विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळेत नियमित योगाचे वर्ग घेतले जातील,” अशी ग्वाही दिली.




