Thursday, June 18, 2026
Home क्राईम न्यूज जामखेड तालुक्यात विहिरीच्या मोजमापावेळी तांत्रिक सहाय्यकाला मारहाण; खर्डा पोलिसांत तक्रार

जामखेड तालुक्यात विहिरीच्या मोजमापावेळी तांत्रिक सहाय्यकाला मारहाण; खर्डा पोलिसांत तक्रार

0
2

जामखेड न्युज – – – – – – – 

जामखेड तालुक्यात विहिरीच्या मोजमापावेळी तांत्रिक सहाय्यकाला मारहाण; खर्डा पोलिसांत तक्रार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीच्या कामाचे मोजमाप व जिओटॅगिंग करत असताना पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जामखेड तालुक्यातील लोणी येथे घडली आहे.

याबाबत दिपक दत्तात्रय बोराडे (वय ४०, रा. मलठण, ता. कर्जत) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोराडे हे पंचायत समिती, जामखेड येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारीनुसार, मंगळवार दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता लोणी येथील अविनाश बबन घुमरे यांच्या विहिरीचे मोजमाप व जिओटॅगिंग करण्यासाठी बोराडे हे ग्रामरोजगार सेवक शिवाजी आप्पा बामदळे आणि विहीर मालक यांच्यासह घटनास्थळी गेले होते.

यावेळी अन्सार नवाब पठाण (रा. लोणी, ता. जामखेड) यांनी तेथे येऊन बोराडे यांना शिवीगाळ करत, “गावात येण्यापूर्वी मला सांगायला हवे होते,” असे म्हणत वाद घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण सुरू केल्यानंतर संबंधिताने गचांडी पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातातील दगड डाव्या पायाच्या पिंढरीवर मारल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यानंतर पुन्हा गावात आल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!