जामखेडमध्ये मारुती मंदिरासमोर नारळ फोडण्याच्या दगडाने हल्ला; तरुण गंभीर जखमी
बटेवाडी शिवारातील मारुती मंदिरासमोर मोटारसायकल उभी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नारळ फोडण्याच्या दगडाने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुकुंद रघुनाथ पोकळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवाजी मधुकर मोरे (वय ५३, व्यवसाय – वॉशिंग सेंटर, रा. पोकळेवस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी दुपारी ते आणि त्यांचे मित्र मुकुंद रघुनाथ पोकळे हे मोटारसायकलवरून देवदर्शनासाठी देवदैठण येथे गेले होते. दर्शन करून परत येत असताना सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते बटेवाडी शिवारातील खर्डा रोडवरील मारुती मंदिरात दर्शनासाठी थांबले. मंदिरासमोर मोटारसायकल लावताच तेथे उपस्थित असलेल्या एका मद्यधुंद व्यक्तीने, “इथे मोटारसायकल का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही,” असे म्हणत वाद घातला.
फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तीने मोटारसायकलची चावी काढून घेत वाहन खाली पाडले. त्यामुळे मोटारसायकलवर बसलेले मुकुंद पोकळे खाली पडले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न सुरू असताना आरोपीने मंदिराजवळील नारळ फोडण्याचा दगड मुकुंद पोकळे यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
मुकुंद पोकळे यांना मदत करण्यासाठी गेलेल्या शिवाजी मोरे यांनाही आरोपीने त्याच दगडाने डोक्यात, उजव्या खांद्यावर आणि पायावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.त्यानंतर शिवाजी मोरे यांनी स्वतःचा शर्ट काढून मुकुंद पोकळे यांच्या डोक्याला बांधला आणि त्यांना मोटारसायकलवरून जामखेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुकुंद पोकळे हे सध्या बेशुद्ध अवस्थेत असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपीने, “माझे नाव बाळू आहे. पोलीस ठाण्यात गेलात तर तुमचे काही खरे नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झटापटीदरम्यान मुकुंद पोकळे यांचा व्हीओ कंपनीचा मोबाईल फोन हरवल्याचेही सांगण्यात आले आहे.
स्थानिकांकडून आरोपीचे नाव बाळू उर्फ दीपक मनोहर खरात (रा. बटेवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे समोर आले. शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात बाळू उर्फ दीपक मनोहर खरात याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सार्वजनिक ठिकाणी वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे हे करत आहेत.