जामखेड न्युज – – – – –
जामखेड शहरातील मासांहारी कत्तलखाने व दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करा – संजय काशिद

जामखेड शहरामध्ये विविध ठिकाणी मासांहारी कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही दुकाने व कत्तलखाने प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या भागात असल्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी तसेच आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे ते शहराबाहेर स्थलांतरित करावेत अशी मागणी भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी निवेदनाद्वारे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांच्या कडे केली आहे.

उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांना निवेदन देताना भाजपा शहरमंडलाध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके, स्वच्छता व आरोग्य सभापती अर्जुन म्हेत्रे, नगरसेवक प्रविण होळकर, माऊली अंदुरे मोहन गडदे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, मांस विक्रीच्या दुकानाच्या घाणीमुळे व हातगाड्यावरील मांसाची वाहतूक कत्तलखान्यातून दुकानापर्यंत केली जाते यामुळे कुत्र्यांचा त्रास शाळकरी मुलांना ज्येष्ठ नागरिक व महिलांना याच्यापासून जीवितेला धोका निर्माण होत आहे.

यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतःलहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच स्वच्छतेच्या दृष्टीनेही ही परिस्थिती गंभीर असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून, शहरातील सर्व मासांहारी कत्तलखाने व संबंधित दुकाने ही नियोजित ठिकाणी,शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावीत.




