कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. नागरिकांच्या वाढत्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
मतदारसंघात ऐन उन्हाळ्यातील तीव्र उकाड्यात विजेच्या अनियमित व खंडित पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. तापमान ४० ते ४२ अंशांच्या पुढे गेलेलं असताना वीज वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.
लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उकाड्याचा तीव्र सामना करावा लागत असून, वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेला थ्री फेज वीजपुरवठा अखंडित मिळत नसल्याने उन्हाळी पिकांचं नुकसान होत आहे. जळालेले डीपी वेळेत बदलले जात नाहीत, कोटेशन भरूनही नवीन वीजजोडण्या मिळत नाहीत, पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नाही, तसेच ‘मागेल त्याला सोलर’ योजनेअंतर्गत इंस्टॉलेशन व देखभाल कामांमध्ये विलंब होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या.
चिलवडी व माही जळगाव उपकेंद्रांची प्रलंबित कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेषतः ए.जी. फिडरवर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा करूनही ठोस तोडगा न निघाल्याने नागरिकांचा संताप वाढला होता.
या गंभीर प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आ.रोहित पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीची दखल घेत लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं. सायंकाळी ६ ते ९ दरम्यान खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, तसेच ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असं अधीक्षक अभियंता श्री. पवार यांनी स्पष्ट केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र, या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कितपत होते, याकडे कर्जत-जामखेडमधील नागरिकांचं लक्ष लागून आहे.
यावेळी रघु आबा काळदाते, नामदेव बापू राऊत, विश्वनाथ राऊत, विशाल म्हेत्रे, गुलाबकाका तनपुरे, मंगेश आजबे, अमृत लिंगडे, प्रशांत राळेभात, रामशेठ कानगुडे, अनिल पांडुळे, दीपक शिंदे, विष्णू नाना मोंढळे, ज्ञानदेव लष्कर, वसीम सय्यद, किशोर तापकीर, राजेंद्र गोरे, सुनील उबाळे, बापू कार्ले, बाबासाहेब गांगर्डे, राजेंद्र पवार, मनोज गायकवाड, अमोल पाटील, बाळासाहेब सपकाळ, किसन बापू ढवळे , संतोष नाना निगुडे, बिबिषण धनवडे, रज्जाक शेख, वैभव काळे, मनोज गायकवाड, राजेंद्र भांडवलकर, महादेव मोटे, डॉ. चंद्रकांत कोरडे, संदीप गांगर्डे, दत्ता साळुंके, गणेश चव्हाण, दादा राजे भोसले, विलास जगदाळे, रावसाहेब जाधव, सतीश चव्हाण, बजरंग डुचे, अशोक गीते, नय्युम शेख, दिलीप जाधव, महेश काळे यांच्यासह कर्जत जामखेड मधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.