Monday, April 13, 2026
Home ताज्या बातम्या अंत्योदयाचा विचार ही भाजपची ओळख – सभापती प्रा. शिंदे प्रशिक्षण...

अंत्योदयाचा विचार ही भाजपची ओळख – सभापती प्रा. शिंदे प्रशिक्षण शिबिरात उत्साही सहभाग

0
2

जामखेड न्युज—–

अंत्योदयाचा विचार ही भाजपची ओळख – सभापती प्रा. शिंदे

प्रशिक्षण शिबिरात उत्साही सहभाग

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार ही भाजपची ओळख आहे. या विचारधारेवर काम करणारा भाजप देशभरात तळागाळातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी येथे केले. पक्षाची विचारधारा व कार्यसंस्कृती कार्यकर्ता केंद्रीत असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षासाठी आपल्या परीने योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

जामखेड शहर मंडल व जामखेड ग्रामीण मंडल यांच्यावतीने येथील विठाई मंगल कार्यालयात दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान शिबीर नुकतेच झाले. या शिबिरात दोनही दिवस सभापती प्रा. शिंदे सक्रिय सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन व समारोप झाला. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे व शारीरिक आरोग्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. वैयक्तिक शिस्त व संघटनात्मक कार्यातील सातत्य यावर मार्गदर्शन केले.

राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः असा विचार भाजप कार्यकर्त्यांमध्ये रुजलेला असतो. याच विचाराच्या आधाराने सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत नेण्याचे काम कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. इतर पक्षांच्या कार्यपद्धतीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची विचारधारा व कार्यसंस्कृती वेगळी आणि कार्यकर्ता केंद्रीत असल्याने पक्षात संघटनात्मक कार्याला विशेष महत्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विविध विषयांवर मार्गदर्शन
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत या प्रशिक्षण शिबिरात दोन दिवस विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद यांनी केले. प्रथम सत्रात वैचारिक अधिष्ठान या विषयावर भाजप प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षपद अजय काशीद (जिल्हा उपाध्यक्ष, भा.ज.पा.) यांनी भूषविले. द्वितीय सत्रात बूथ व्यवस्थापन या विषयावर भाजप मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांनी मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्षपद प्रांजलताई अमित चिंतामणी (नगराध्यक्षा, जामखेड नगर परिषद) यांनी भूषविले. तृतीय सत्रात पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक कार्याचा विस्तार या विषयावर प्रदेश चिटणीस माजी आमदार राम सातपुते यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात (ज्येष्ठ नेते) होते.

चौथ्या सत्रात सोशल मीडिया, एआय व नमो अ‍ॅप या विषयावर राजेश्वर श्रीराम यांनी मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्ष शरद कार्ले (सभापती, जामखेड बाजार समिती) होते. पाचव्या सत्रात आपल्या सरकारची कामगिरी या विषयावर उत्तर महाराष्ट्र अभियान प्रमुख प्रदीप पेशकार यांनी मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्ष रवींद्र सुरवसे (जिल्हा उपाध्यक्ष) होते. यावेळी अहिल्यानगर भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित केले.

सहाव्या सत्रात इतिहास व विकास या विषयावर माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. भगवान मुरूमकर (माजी सभापती, जामखेड पंचायत समिती) यांनी भूषविले.सातव्या सत्रात कार्यकर्ता कार्यपद्धती या विषयावर प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष दत्तात्रय वारे (माजी जिल्हा परिषद सदस्य) होते. या प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्ष विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती, तांत्रिक साधनांचा वापर तसेच बुथ स्तरावरील नियोजन याबाबत मार्गदर्शन मिळाले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जामखेड नगराध्यक्ष सौ. प्राजंलीताई चिंतामणी,जामखेड शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद,जामखेड ग्रामीण मंडलाध्यक्ष बापूसाहेब ढवळे, महिला मंडलाध्यक्ष संजीवनीताई पाटील,राज्य परिषद सदस्य मनोजकाका कुलकर्णी, नगरसेवक अमित चिंतामणीआणि सर्व नगरसेवक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक तसेच जामखेड शहर व ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!