विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार – सभापती प्रा. राम शिंदे कर्जत – जामखेडमधील १४० शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार – सभापती प्रा. राम शिंदे
कर्जत – जामखेडमधील १४० शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण
ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक गुणवत्तेतील तफावत दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. नवीन डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन शिक्षण प्रक्रिया अधिक रंजक व सुलभ होईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले आत्मबळ वाढवावे, जेणेकरून ते स्पर्धा परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने यश मिळवू शकतील, असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
शिक्षकांनी डिजिटल साधनांचा केवळ वापर न करता त्या माध्यमातून अध्यापन पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणावेत. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देत शिक्षण प्रक्रिया तणावमुक्त कशी करता येईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि अत्याधुनिक सुविधा यांच्या संगमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी झेप घेण्याची क्षमता निर्माण होईल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग वाढवण्यासाठी शिक्षकांनी या सुविधांचा सातत्याने प्रभावी उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सतत ज्ञान संपादनाची वृत्ती जोपासावी. केवळ शालेय अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावरील ज्ञानाशी जोडले जाण्यासाठी या सुविधांचा उपयोग करावा. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवून त्यांना प्रोत्साहन द्यावे. भविष्यात हे विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊन शहरातील विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड यश संपादन करतील, अशी अपेक्षाही सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, आधुनिक काळात तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरापासूनच या प्रवाहाशी जोडले जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे सक्षम पिढी घडवण्यास मोठी मदत होईल. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवावा. शिक्षकांनी या आधुनिक साधनांचा अधिकाधिक उपयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया तयार होईल, असे त्यांनी नमूद केले.
शासकीय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या संधींचा योग्य उपयोग करणे ही विद्यार्थ्यांसह पालकांचीही जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी सजग राहून मुले या तंत्रज्ञानाचा किती प्रभावी वापर करतात याकडे लक्ष द्यावे. आजचे युग स्पर्धेचे असून, शाळांमध्ये मिळणारे हे आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवेल. या सुवर्णसंधीचा सकारात्मक उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी उचललेले हे पाऊल जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जामखेड येथील तापनेश्वर जिल्हा परिषद शाळेत नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वेणुगोपाल रेड्डी, एकनाथ डवले आणि डॉ. पंकज आशिया यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आनंद भंडारी यांनी केले.
कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वितरण प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये किमतीच्या डिजिटल शैक्षणिक साहित्याचे आतापर्यंत एकूण ३४३ जिल्हा परिषद शाळांना वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील २२५, जामखेड तालुक्यातील ११४ तसेच अहिल्यानगरमधील ४ शाळांचा समावेश आहे.
प्रत्येक शाळेला ६५ इंची संवादात्मक फलक, ई-शिक्षण प्रणाली, बिनतारी की-बोर्ड व सूचक उपकरण तसेच अखंड वीजपुरवठा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील एकूण २६६ शाळांपैकी सन २०२२-२३ मध्ये ४१, सन २०२४-२५ मध्ये १०० आणि सन २०२५-२६ मध्ये ८४ अशा एकूण २२५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील एकूण १७३ शाळांपैकी सन २०२२-२३ मध्ये ३०, सन २०२४-२५ मध्ये २८ आणि सन २०२५-२६ मध्ये ५६ अशा एकूण ११४ शाळांमध्ये डिजिटल साहित्य वितरित करण्यात आले आहे.