राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र भापकर यांचा दिल्लीत सन्मान
देशातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातील शिक्षण खुले व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे विविध शैक्षणिक गेम्स व ॲप्स चा शिक्षणात वापर कसा करता येईल यावर NCERT नवी दिल्ली यांच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी हस्तपुस्तिका तयार करण्यात येत आहे.
या कामातील विशेष योगदानाबद्दल जामखेड तालुक्यातील जि. प.शाळा महात्मा फुले नगर ( शिऊर) येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र भापकर यांचा नुकताच NCERT चे संचालक श्री अमरेंद्र बेहरा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दिनांक 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत झालेल्या विशेष कार्य शाळेच्या समारोप प्रसंगी त्यांनी हा सन्मान केला. या हस्तपुस्तिकेचा उपयोग देशभरातील 25 कोटी विद्यार्थी व 1 कोटी शिक्षकांना होईल असे यावेळी एन.सी.आर.टी चे संचालक श्री बेहरा यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर शिक्षणाचे पवित्र कार्य करून देशपातळीवर भापकर सरांनी केलेले कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे.
श्री भापकर हे राष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते शिक्षक असून ते NCERT नवी दिल्लीचे राष्ट्रीय ICT अॅम्बेसेडर म्हणून कार्यरत आहेत.तसेच सायबर स्पेस स्पर्धेचे राष्ट्रीय परीक्षक, महाराष्ट्र शासनाच्या थिंक टॅंकचे सदस्य, तसेच बालभारती च्या इतिहास विभागाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, त्यांची PM eVidya या DTH चॅनलच्या तांत्रिक समन्वयक पदावर निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे हे बहुमुखी योगदान देशभरातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी मानले जाते.
या निवडीबद्दल राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व अभिमान व्यक्त केला जात आहे. डिजिटल युगात अभ्यासक्रमाशी संलग्न शैक्षणिक गेम्सचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक आकर्षक व परिणामकारक करण्याच्या दिशेने श्री. भापकर यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्यांच्या या कामगिरी बाबत अहिल्यानगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण ,विस्तार अधिकारी अशोक आंधळे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड सह मित्रमंडळी व नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.