Monday, February 16, 2026
Home शैक्षणिक बातम्या बांधखडक, वनवेवस्ती,चव्हाणवस्ती व ढाळेवस्ती येयील विद्यार्थी व शिक्षकांसह पालकांनी लुटला शैक्षणिक सहलीचा...

बांधखडक, वनवेवस्ती,चव्हाणवस्ती व ढाळेवस्ती येयील विद्यार्थी व शिक्षकांसह पालकांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद कोकणातील माजी विद्यार्थ्यांकडून मनोहर इनामदार यांना ‘गुरूगौरव” सन्मान

0
8

जामखेड न्युज—–

बांधखडक, वनवेवस्ती,चव्हाणवस्ती व ढाळेवस्ती येयील विद्यार्थी व शिक्षकांसह पालकांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद

  • कोकणातील माजी विद्यार्थ्यांकडून मनोहर इनामदार यांना ‘गुरूगौरव” सन्मान

विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक सहलींचे अनन्यसाधारण महत्त्व असून चार भिंतींच्या आत मिळणाऱ्या पुस्तकी माहितीपेक्षा सहलींच्या माध्यमातून मिळणारे अनुभवजन्य ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त व दीर्घकालीन परिणामकारक ठरते.

याच उद्देशाने तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा बांधखडक, वनवेवस्ती, चव्हाणवस्ती व ढाळेवस्ती या ४शाळांतील ५४ विद्यार्थी, ५०पालक व ४शिक्षक यांची संयुक्त ‘कोकण दर्शन ‘ शैक्षणिक सहल नुकतीच दि.१०फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या ३दिवसांच्या काळात यशस्वीरित्या संपन्न झाली.

महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या ‘रायगड’ किल्ल्यासह अष्टविनायक क्षेत्र रांजणगाव व पाली, दक्षिण काशी हरिहरेश्वर, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देहू -आळंदी सारखी तीर्थक्षेत्रे, जगप्रसिद्ध कार्ला लेणी व एकवीरा देवी मंदिर, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले तुळापूर, भूनंदनवन श्रीवर्धन व दिवेआगर येथील स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे,उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड, पुण्याजवळील केतकावळे येथील बालाजी मंदिर आणि दत्तक्षेत्र नारायणपूर इ.ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

याच शैक्षणिक सहलीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या ‘बापवली’ येथील आदर्श शाळा भेटीचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरला.सध्या बांधखडक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मनोहर इनामदार हे शिक्षक म्हणून सन १९९८ते २००८ या १०वर्षांच्या काळात बापवली शाळेत कार्यरत होते.शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने शाळा भेटीसाठी आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे बापवलीसह मामवली,गुळधे, निरंजनवाडी इ.पंचक्रोशीतील गावांतून बहुसंख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला व खास मुंबईहून आलेले माजी विद्यार्थी या सर्वांनी मोठ्या उत्साहात सहलीचे अभूतपूर्व स्वागत केले.

या कार्यक्रमात बापवली शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून मनोहर इनामदार यांना ‘गुरूगौरव’ सन्मान प्रदान करण्यात आला.तब्बल १८ वर्षांनंतर शिक्षक व विद्यार्थी यांच्या अभूतपूर्व व ह्रदयस्पर्शी भेटीने आणि पूर्वस्मृतींनी प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बापवली शाळेचे मुख्याध्यापक अमोल केतकर यांनी केले.स्वच्छ, सुंदर व आदर्श गाव असलेल्या बापवली येथील विविध ग्रामविकासाच्या उपक्रमांचा परिचय व प्रगतीचा आलेख मांडून सर्वांचे शाब्दिक स्वागत शिक्षणतज्ज्ञ अशोक भोसले बापवलीकर यांनी केले.शाळेचे माजी विद्यार्थी तथा युवा उद्योजक प्रमोद डापले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करून इनामदार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेत अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले.

सहलीतील शिक्षक प्रतिनिधी म्हणून चव्हाणवस्ती शाळेचे मुख्याध्यापक नितीन जाधव यांनी बापवलीकरांनी केलेल्या अभूतपूर्व पाहुणचार व स्वागत सोहळ्याबद्दल आभार मानले. बांधखडक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयकुमार वारे, वनवेवस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेश्मा वनवे व चव्हाणवस्ती शाळेतील शिक्षणप्रेमी भीमराव कुटे यांचा पालक प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

या शैक्षणिक सहलीच्या यशस्वितेसाठी मनोहर इनामदार, नितीन जाधव, संदीप शेलार, मच्छिंद्र देशमुख या सहलीत समाविष्ट असलेल्या शिक्षकांसह विकास सौने, नितीन घालमे, स्मिता सोनवणे व खंडू सोळंके या शिक्षक बांधवांनी तसेच बालाजी वनवे, भाऊसाहेब वारे व मच्छिंद्र चव्हाण या पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!