अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा शहर व परिसरातील पाच युवकांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने संपूर्ण परिसरात अभिमान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या युवकांच्या यशाबद्दल विविध ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
जायभायवाडी येथील शुभम रघुनाथ केकान, नागोबाचीवाडी येथील नामदेव लहू गोपाळघरे व राहुल पोपट गोपाळघरे, गीतेवाडी येथील तुषार त्रिंबक गीते तसेच खर्डा शहरातील आदेश अनिल सुरवसे या युवकांनी सैन्य दलात भरती होऊन परिसराचा नावलौकिक वाढवला आहे.
यामध्ये राहुल पोपट गोपाळघरे यांची सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) तर उर्वरित चौघांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) निवड झाली आहे.
या यशाबद्दल संबंधित गावांमध्ये ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. दीर्घकाळ केलेल्या कठोर मेहनतीचे फळ मिळाल्याने खर्डा शहरासह जायभायवाडी, गीतेवाडी व नागोबाचीवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.
या युवकांच्या निवडीमुळे परिसरातील अनेक तरुण सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरित झाले असून, शिस्त, मेहनत व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश मिळवता येते असा संदेश या उदाहरणातून मिळत आहे. आपल्या मुलांच्या यशाने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्टपणे दिसून आले.
या प्रसंगी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थांनी या युवकांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या.