जामखेड तालुक्यात रानडुक्करांचा हैदोस, शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हैराण
जामखेड तालुक्यातील साकत, सावरगाव, देवदेठण, खर्डा, मोहरी, दिघोळ, गवळवाडी परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ज्वारी, मका, हरभरा, भुईमूग पिकांची नासाडी करत नुकसान केले आहे. गवळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर थोरात यांच्या जनावरांसाठी असलेल्या घास व मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.
तर सावरगाव येथील फाळके व साकत येथील अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रात्रीच्या सुमारास रानडुकरांचे कळप अचानक शेतात घुसून घासाच्या मुळ्या उपटून, दाताने चावून पिकांचे नुकसान करीत आहेत. ज्वारी पिकांचे ताट करंडून टाकतात. डुक्करांनी करंडलेले ताट परत जनावरे खात नाहीत.
साकत, खर्डा परिसर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात. मात्र रात्री बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. याच परिस्थितीचा फायदा घेत रानडुकरांनी शेतात हैदोस घातला आहे. कांदा, हरभरा, गहू, ज्वारी यांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
दूध उत्पादनासाठी ज्वारीच्या कडव्यांसोबत दूध वाढीसाठी शेतकरी मका, घास व अन्य हिरवा चारा पिकवतात. मात्र या चारा पिकांवरही रानडुकरांकडून हल्ले होत असल्याने पशुपालक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत.
या सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.