जामखेड न्युज——
विधानपरिषद सभापतीपदी आमदार प्रा. राम शिंदे ?
विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपकडून राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी राम शिंदे यांचं नाव भाजपकडून सर्वात पुढे आहे. नगरच्या कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले राम शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून पराभूत झाले. त्यानंतर आता त्यांची विधानपरिषदेवर निवड झालीय. त्यांना विधान परिषदेचे सभापती म्हणून संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे.
विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच घेण्यात येण्याची शक्यता असून गुरुवारी किंवा शुक्रवारी ती होण्याची शक्यता आहे. विधान परिषद सभापतीपदी आपलाच आमदार असावा, असे भाजपचे राजकीय गणित असून त्यादृष्टीने धनगर समाजातील आणि मराठवाड्यातील नेते प्रा. राम शिंदे आणि आमदार प्रवीण दरेकर आदींच्या नावांचा वरिष्ठ नेते विचार करीत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी संपणार आहे आणि पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. विधान परिषद सभापतीपद रामराजे नाईक-निंबाळकर निवृत्त झाल्यापासून सुमारे दोन वर्षे रिक्त आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे कार्यभार असून त्या शिवसेना शिंदे गटाबरोबर आहेत. पण आता सभापतीपदी भाजपच्या नेत्याची निवड व्हावी, असे वरिष्ठ नेत्यांनी ठरविले आहे.
महायुतीकडे बहुमत
सभागृहात ७८ पैकी २७ जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्यपालनियुक्त १२ आमदारांची नियुक्ती केली जाईल आणि नंतरही महायुतीकडे बहुमत राहील. पण तरीही पुढील काळात काही राजकीय घडामोडी झाल्या, तर भाजपकडे सभापतीपद असलेले चांगले राहील, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.
त्यादृष्टीने निवडणुकीची तारीख घोषित करण्याबाबत राज्यपालांना पत्र पाठविले जाणार आहे. पण फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींशी अंतिम चर्चा होऊन निवडणूक या अधिवेशनात घ्यायची की हिवाळी अधिवेशनात हे निश्चित करून उमेदवाराची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.