जामखेड न्युज——
शरद पवार यांनी नगर जिल्ह्याचे वाटोळं केलं
डॉ सुजय विखे पाटील गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार – राधाकृष्ण विखे पाटील

भाजपचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘नगर जिल्ह्याचे वाटोळे शरद पवार यांनी केले. नगर जिल्ह्यात विकासात्मक काम करण्यासाठी धडपडत असलेल्या विखे परिवाराला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून वारंवार होत आला आहे.’, असा गंभीर आरोप मंत्री विखे यांनी केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री विखे यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला.

मंत्री विखे म्हणाले, “शरद पवार यांच्याकडून विखेंना निस्तेनाबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. हा प्रयत्न आजचा नाही. नगर जिल्ह्यामधील असंतुष्ट लोकांची मोट बांधायची. त्यांना फक्त शिमगा करायला लावायचा. परंतु हे करताना शरद पवार यांचे नगर जिल्ह्यासाठी योगदान काय आहे, हे देखील पाहिले पाहिजे”.

एमआयडीसीसाठी यांचे योगदान काय आहे? जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी योगदान आलाय का? कुकडीचा कालवा 1400 क्युसेक वरून 800 क्युसेक करून ठेवलाय. केंद्रामध्ये हे संरक्षण मंत्री होते त्यावेळेस के. के. रेंजचा प्रश्न सोडवता आला असता.

परंतु त्यावर देखील त्यांनी काम केले नाही. लोकांच्या जिव्हाळ्याच्या असलेला हा प्रश्न का निकाली काढला नाही. म्हणून आयात केलेला उमेदवार उभा करून निवडणूक लढवत आहे. परंतु जनता ही दूधखुळी नाही.’ असे मंत्री विखे यांनी म्हटले.
‘शरद पवार यांचे मनसुबे 2019 मध्येच नगर जिल्ह्यातील जनतेने धुळीस मिळवले होते. या वेळेस देखील भाजपचा उमेदवार नगर जिल्ह्यात गेल्या वेळेपेक्षा जास्त मताने निवडून येईल.’ असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.






