Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या राज्यातील शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’, पहा कोणत्या कपड्यांना बंदी ?

राज्यातील शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’, पहा कोणत्या कपड्यांना बंदी ?

0
663

जामखेड न्युज——

राज्यातील शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’, पहा कोणत्या कपड्यांना बंदी ?

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व शिक्षण संस्थेतील कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता तसेच पुरूष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पँट परिधान करावी. जीन्स टी शर्ट चालणार नाही किंबहुना चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नको, असे शालेय शिक्षण विभागाने बजावले आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले. तसेच शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. शिक्षक भावी पिढी घडवत असतात, जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. शिक्षकांचा संबंध विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. त्यामुळे अध्यापनाचे काम करताना आपला पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. शिक्षकाचा पेहराव अशोभनीय, अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच विद्यार्थ्यांवर होतो असे नमूद करून शिक्षकांच्या पेहरावासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या.

 

महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा. शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड, परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा, पेहरावाला शोभतील अशी पादत्राणे असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे. शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्यात यावे, या संदर्भातील बोधचिन्ह शिक्षण आयुक्त यांनी निश्चित करावे, हे संबोधन आणि बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मज्जाव असलेला पेहराव
शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट परिधान करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!