जामखेड न्युज——
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची सांडपाणी व्यवस्थापन राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड
जामखेडचे कर्तव्यतत्पर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य सांडपाणी व्यवस्थापन राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची जामखेडचा पदभार स्वीकारल्यापासून रोजगार हमी तून लखपती योजना, जैतादेही पॅटर्न, घरकुल योजनेत निश्चित उदिष्ट पुर्ण करत जामखेड तालुका शंभर टक्के घरकुल पुर्ण करणारा पहिला तालुका ठरला आहे. तसेच रोजगार हमी योजनेचे ते महाराष्ट्राचे मास्टर ट्रेनर आहेत.
रोजगार हमी मार्फत कामे
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक मागणी गायगोठे, शेळीपालन शेड तसेच शाळेच्या संरक्षक भिंती, रस्ते, अंगणवाडी या कामांना आहे. परंतु जामखेड तालुक्यात अकुशल कामांचे प्रमाण कमी असल्याने वरील कुशल कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करता येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात अकुशल कामे जसे की वृक्षलागवड, फळबाग लागवड, घरकुल, मुरमाचे रस्ते, जलसंधारण कामे झाली पाहिजेत. जेणेकरून या कामातून जास्तीत जास्त मनुष्यदिन निर्मिती होऊन कुशल कामासाठी अवकाश तयार होईल. जेव्हा 60 रु चे अकुशल काम होते तेव्हा 40 रु. कुशल कामासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे जितके अकुशल काम जास्त तितके कुशल काम जास्त होणार आहे.
जैतादेही पॅटर्न’
जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसर विकसित करण्याबाबत चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जैतादेही शाळेचे नियोजन मनरेगा योजनेच्या माध्यमातून केल्यानंतर शासनाने त्याची दखल घेतली. ‘जैतादेही पॅटर्न’ राज्यातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविण्याबाबत मग्रारोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शासन परिपत्रक काढले आहे.
सांडपाणी व्यवस्थापन राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड
वरील सर्व कामे पाहता गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापन राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.