जामखेड न्युज——
अतिक्रमणामुळे वाघा ग्रामपंचायतचे तीन सदस्य अपात्र
जामखेड तालुक्यातील वाघा ग्रामपंचायतीचे तीन सदस्यांचे अतिक्रमण आढळून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. तीन सदस्य अपात्र झाल्याने वाघा ग्रामपंचायतीत खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, कांतीलाल श्रीमंत जगदाळे रा. वाघा यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला की

संदिपान बापुराव बारस्कर यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन ग्रामपंचायत मालकीचा गट नं. ३१३ मध्ये घर शौचालयाचे बांधकाम करुन अतिक्रमण केले. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चौकशी करुन बारस्कर यांना अपात्र केले आहे.

सचिन सुभाष साळवे यांनी वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य सूर्यभान दशरथ साळवे यांच्या विरुध्द ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला.

सुर्यभान साळवे यांनी ग्रामपंचायत मालकीचा गट नं. ३१३ मध्ये बेकायदेशीरपणे बांधकाम व वॉल कंपाऊंड, शौचालय बांधून शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना देखील अपात्र घोषित करण्यात आले आहे.

तसेच सोनाली उमेश बारस्कर यांनी वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य आरती शिवाजी बारस्कर यांच्या विरोधात ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल करुन आरती बारस्कर यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गट नं. २३३ मध्ये बेकायदेशीर रित्या कांदा चाळ उभारुन शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी आरती बारस्कर यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सदरील तिनही ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र म्हणून घोषित केलेले आहे. सात सदस्य असलेल्या वाघा गावच्या ग्रामपंचायतचे तीन सदस्य अतिक्रमणामुळे रद्द झाल्याने तालुक्यातील इतर ग्रामपंचायतमध्ये अतिक्रमण केलेले सदस्य गॅसवर आहेत.










