जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड शहरात चारपदरी रस्ता होणार असून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाला कात्री लागणार आहे असे बोलले जात आहे. अनेक व्यापारी व व्यावसायिक याचे रस्त्यालगत मोठ मोठे बांधकामे आहेत. अतिक्रमण हटविणार असलेल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे तसेच आमदार खासदार यांना निवेदन देवून शहरात अंतर कमी करावे अशी मागणी होत आहे.

जामखेड शहर राष्ट्रीय महामार्गाने जोडले जात असतानाच, जामखेड शहरांतर्गत ३ हजार ६२५ मीटर लांबीचा रस्ता हा चारपदरी करण्यात येणार आहे. या कामाला येत्या दिड ते दोन महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने याकामाची निविदा प्रक्रिया २७ सप्टेबर २०२२ रोजी पुर्ण केली. पुणे येथील धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाची निविदा मिळाली आहे. या कामाची अंदाजपत्रकीय मंजूरी रक्कम १५७ कोटी ६२ लाख रूपये होती. प्रत्यक्ष प्रकल्पाची निविदा रक्कम १३३ कोटी २७ लाख रूपये होती. मात्र ठेकदाराची निविदा करार किंमत ३५ कोटी ४० लाखाने कमी होवून, ८६ कोटी ९ लाख रूपये झाली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या महामार्गाला सहा वर्षापुर्वी दि. ३ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला होता. या महामार्गाच्या अंतर्गत जामखेड शहरातंर्गत ३ हजार ६२५ मीटर लांबीचा चारपदरी रस्ता व पुढे जामखेड पासून सौताड्यापर्यंत १० मीटर रूंदीचा काँक्रीट रस्ता करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील कोठारी पेट्रोलपंप ते बीड रस्त्यावरील सौताडा गावापर्यंत तब्बल १४ किलोमीटर अंतराचे हे काम आहे.

यापैकी जामखेड शहरांतर्गत ३ हजार ६०० मीटर लांबीचा चारपदरी रस्ता करण्यात येणार आहे. साधारण हा रस्ता कोठारी पेट्रोलपंप ते बीड रस्त्यावरील सीएनजी पंपापर्यंत चारपदरी करण्यात येणार आहे. जामखेड शहरांतर्गत ३० मीटर रूंदीचा चारपदरी रस्ता करताना या रस्त्यावर मधोमध रोड दुभाजक , दोन्ही बाजूने साडेसात मीटर रूंदीचा काँक्रीटीकरण रस्ता, पाच मीटर रूंदीचे डांबरीकरण व १.३० मीटर रूंदीचे फुटपाथ व साईड गटार असा ३० मीटर रूंदीचा रस्ता करतानाच, या रस्त्यावर दुभाजकाच्या मधोमध स्टेटलाईट बसविण्यात येणार आहे.

हा महामार्ग जामखेडसह मराठवाडयाला पुणे महानगर व राजधानी मुंबईला जोडणारा जवळचा रस्ता ठरणार आहे. जामखेड नगर शिक्रापुर मार्गाने जाणारी वाहतूक या जवळच्या मार्गाने वळवल्यामुळे नगर, शिरूर, शिक्रापुर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. या रस्त्यामुळे मराठवाडयातील बीड उस्मानाबाद लातूर नांदेड या जिल्ह्यांना पुणे महानगर , पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहत तसेच मुंबईला जोडणारा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पुणे परिसरात औद्योगिक वसाहती ,औद्योगिक दृष्टया अविकसीत असलेल्या मराठवाड्याशी जोडल्या जाणार असल्याने त्या परिसरात नव्याने औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर याभागातील शेतीमालास कमी वेळेत पुणे मुंबई येथील बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतक-यांना शेतीमालास चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी अंतर्गत जामखेड शहरांतर्गत चारपदरी रस्त्याचे कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली आहे. कार्यारंभ आदेश होवून साधारण दोन महिण्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. आशी माहिती राष्ट्रीय महामार्ग कार्यालय उपविभाग अहमदनगर चे उपअभियंता दिलीप तारडे यांनी दिली.




