जामखेड न्युज——
जामखेडच्या बाफना उद्योग समुहास नुकतेच पुणे याठिकाणी राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे बाफना उद्योग समूहाची महाराष्ट्र पातळी वर नोंद झाली आहे. यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुरस्कारामुळे बाफना परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तीन वर्षात सामाजिक बांधीलकी जपत शेकडो कामगारांना आपल्या उद्योग समुहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला. कोरोना काळातही कंपनीची यशस्वी वाटचाल चांगली राहिल्याने नुकताच जामखेड येथिल बाफना ग्रुप ऑफ़ इंडस्ट्रीज मधील बाफना पॉलिमर इंडिया या कंपनी साठी हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे तर अनेक ठिकाणी सत्कार झाले आहेत.
बाफना उद्योग समुहास सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते व जिल्हा उद्योग केंद्र पुणे येथील नरेंद्र घुले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग भुषण २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रतील विविध क्षेत्रातील ४२ उत्पादक कंपन्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या मध्ये अहमदनगर जिल्हातील ६ कंपन्यांचा समावेश होता.
मिळालेला पुरस्कार हा आमच्या संपुर्ण समुहास व काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे श्रेय आहे. समुहा मध्ये काम करताना एक परीवार म्हणून कंपनीची सर्व टीम एकदिलाने काम करते. पुरस्कार मिळाला असल्याने ही कौतुकाची थाप आमच्यावर पडली आहे. या पुढे अशाच पद्धतीने वाटचाल करत बाफना उद्योग समुह नवीन नवीन क्षेत्रात पाऊल ठेवेल.
बाफना उद्योग समुहाचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्रात पोहचले आहे तसेच लवकरच महाराष्ट्रा बाहेर देखील चांगल्या गुणवत्तेचे प्रोडॉक्ट पुरवण्यात येणार आहेत अशी माहिती उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश बाफना यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.