जामखेड न्युज——
भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील भरती कार्यालयाच्या वतीने अहमदनगर मधील राहूरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या २३ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘अग्निवीर भरती मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन श्रेणींकरता ६८ हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे.
उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आली आहेत. या भरती मेळाव्यासाठी तरूणांमध्ये उत्साह आहे.
या भरती मेळाव्यासाठी अहमदनगरचे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. उमेदवारांच्या भरती प्रक्रियेसाठी व्यावसायिक पद्धतीने पायाभूत सुविधा आणि एकूण मांडणी केली आहे.
उमेदवारांसाठी भोजन, पेयजल आणि विश्रांतीची सोय देखील करण्यात आली आहे. भरती मेळाव्यासाठी दररोज ५ हजार उमेदवार येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. यामध्ये १.६ किमी धावणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल.
राहुरी येथे वैद्यकीय तपासणीसाठी लष्कराच्या डॉक्टरांचे एक समर्पित पथक देखील तैनात करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना सर्व संबंधित कागदपत्रे बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशी माहिती भारतीय संरक्षण दलाचे पुणे येथील जनसंपर्क अधिकारी महेश अय्यंगार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.