जामखेड न्युज——
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी लवकरच या महामार्गावर ‘इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) बसविण्यात येणार आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी लवकरच या महामार्गावर ‘इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) बसविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत महामार्गावर २९ ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी यंत्रणा बसविली जाणार आहे, तर ३४ ठिकाणी मार्गिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा शोध घेणारी यंत्रणा बसविली जाणार आहे. ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) या कामासाठी ३ ऑगस्टला कार्यादेश दिले आहेत. पुढील नऊ महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होणार असून त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यास मदत होणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची लांबी सुमारे ९४ किलोमीटर आहे. या महामार्गावरून दरदिवशी सुमारे ६० हजार वाहने प्रवास करतात. मात्र महामार्गावर वाहनांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. बेदरकारपणे वाहने चालविल्याने झालेल्या अपघातांमधून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आवश्यकता आहे.
‘एमएसआरडीसी’कडून आयटीएमएस यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया २०१८मध्ये सुरू झाली होती. मात्र प्रकल्पाला विलंब झाला. प्रकल्प अनेक वर्षे रखडल्याने महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र आता या प्रकल्पाची अंमलबजावणी दृष्टिक्षेपात आली आहे. महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर या यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला जाणार आहे. तसेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नाइझेशन यंत्रणा बसविली जाणार असून त्याद्वारे पथकर नाक्यावरच दंड गोळा केला जाणार आहे.
‘एमएसआरडीसी’ने या प्रकल्पासाठी सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर ‘प्रोक्टेक सोल्युशन्स लि.’ या खासगी कंपनीला १० वर्षांचे कंत्राट दिले आहे. ही यंत्रणा ११५ कोटी रुपयांची आहे. एमएसआरडीसी या कंपनीला ४० कोटी रुपये देणार आहे. तसेच वाहनांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडातील काही रक्कम कंपनीला पुढील १० वर्षांच्या व्यवस्थापनासाठी दिली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘या कामाचे कार्यादेश ३ ऑगस्टला प्रोक्टेकला दिले आहेत. पुढील नऊ महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे’, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
या नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
वेगमर्यादेचे उल्लंघन, बेकायदेशीर थांबा, नो एंट्री अथवा विरुद्ध दिशेने वाहने हाकणे, मार्गिकेच्या नियमांचे उल्लंघन, मोबाइल फोनचा वापर, सीट बेल्टचा वापर न करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नियमापेक्षा अधिक मालाची वाहतूक, प्रतिबंधित क्षेत्रात दुचाकींचा प्रवेश आदी गुन्हे करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
या यंत्रणा बसविणार
वेग मर्यादा तपासणी – ३९ ठिकाणी
मार्गिका शिस्तपालन – ३४ ठिकाणी
सीसीटीव्ही कॅमेरा – १३० ठिकाणी
परिवर्तनीय संदेश देणारी चिन्हे – २३ ठिकाणी
हवामान यंत्रणा – ११ ठिकाणी
पाळत ठेवणारी व्हॅन – चार
वाहन ट्रॅकिंग प्रणाली – ३६. (अॅम्ब्युलन्स, क्रेन, टोविंग व्हॅन आदींना बसविणार.)