आई व दोन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला चार जणांवर गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्यानंतर सतरा तासांनी मृतदेहाचे शवविच्छेदन

0
2313

जामखेड न्युज—–

आई व दोन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला चार जणांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झाल्यानंतर सतरा तासांनी मृतदेहाचे शवविच्छेदन

घरबांधणी व विहिर खोदण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत यासाठी पती, सासरे, ननंद व नंदावा यांच्या कडून सतत छळ होत होता या छळाला कंटाळून रूपाली नाना उगले वय २५ मुलगा समर्थ नाना उगले वय ६ साक्षी नाना उगले वय ४ रा. नायगाव ता. जामखेड यांनी दि. ८ आँगस्ट शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या आसपास घराजवळील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वरील चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता रूपाली उगले हिने दोन्ही मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सायंकाळी आठ वाजता तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणले पण माहेरकडील नातेवाईकांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करू नये अशी मागणी केली यानुसार आज शनिवारी सकाळी खर्डा पोलीस स्टेशनला मयत रूपालीचे पती,नाना प्रकाश उगले, सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले रा. नायगांव ता. जामखेड तसेच तिची ननंद मनिषा शिवाजी टाळके व तिचे पती शिवाजी गोरख टाळके रा. राळेसांगवी ता. भुम जि. धाराशिव या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर बारा साडे बारा वाजता शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर नायगाव येथे मृतदेह घेऊन जात असताना मयत रूपाली च्या नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुळे गोंधळ सुरू झाला होता खर्डा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी श्रीरंग सकुंडे वय 50 वर्षे, व्यवसाय शेती, रा. राळेसांगवी पोस्टे. पाटसांगवी ता. भूम जिल्हा धाराशिव खर्डा पोलीस स्टेशन दिलेल्या फिर्यादीत म्हटले म्हटले आहे की, पाटसांगवी येथे घरामध्ये पत्नी कमल असे दोघे एकत्र राहतो व शेती व्यवसाय करतो. मला दोन मुले अंकुश व विशाल असे असुन ते कामानिमीत्त पुणे येथे राहत आहेत तसेच दोन मुली पार्वती व रूपाली अशा असुन लहान मुलगी रूपाली नाना उगले वय 25 वर्ष रा.नायगांव ता.जामखेड जिल्हा अहिल्यानगर हिचा विवाह सुमारे 8 वर्षापुर्वी नायगांव ता. जामखेड येथे जावयाचे गावी नायगांव येथे करून दिला होता.

त्यानंतर तिला दोन मुले समर्थ नाना उगले वय 6 वर्ष व साक्षी नाना उगले वय 4वर्ष असे झाले होते. विवाहानंतर मुलगी रूपाली हिला दिड वर्ष चांगले नांदविले होते.विवाहानंतर सुमारे दिड वर्षाने मुलगी रूपाली हिला जावई नाना प्रकाश उगले व तिचे सासरे प्रकाश हे त्रास देवू लागले, तिला आमचेकडे माहेरी येवू देत नव्हते तसेच आम्हाला मुलगी रूपाली हिला भेटायला देत नसत व फोनवरही बोलू देत नसत. तसेच वारंवार मलगी रूपाली हिचे मार्फत आमच्याकडे 2 लाख रूपयाची मागणी करीत असल्याचे मला रूपाली हिने मी तिला भेटायला गेल्यानंतर सांगीतले होते. मुलीचा संसार सुखाने व्हावा म्हणुन मी जावयाच्या मागणी प्रमाणे त्यांना 2 लाख रूपये दिले होते. त्यानंतर मुलगी रूपाली हिचा काही वर्ष संसार सुखाने चालू होता. परंतु ते मुलीला आमच्याकडे पाठवित नव्हते व फोनवर देखील बोलू देत नव्हते.

त्यादरम्यान मुलीला दोन अपत्य झालेली आहेत. मगील दोन वर्षा पुर्वी मुलगी रूपाली हिची सासु मयत झाल्यानंतर पुन्हा जावई नाना प्रकाश उगले, सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले रा. नायगांव ता. जामखेड तसेच तिची ननंद मनिषा शिवाजी टाळके व तिचे पती शिवाजी गोरख टाळके रा. राळेसांगवी ता.भूम जिल्हा धाराशिव हे सर्वजण त्रास देवू लागले, मुलगी रूपाली हिची सासु मयत झाल्यानंतर तिची ननंद व नंदावा हे त्यांचे संसारामध्ये ढवळाढवळ करून नेहमी त्यांचे गावी जावून तुला संसार करताज्ञयेत नाही. घरामधील काम व्यवस्थीत करत नाहीस माझ्या भावाकडे लक्ष देत नाहीस. तु चांगला संसार केला नाहीस तर माझ्या भावाचे दोन दिवसात दुसरे लग्न करून देवू असे म्हणुन ते सांगतील तसेच वागायचे असे म्हणत असायचे. त्यानंतर पुन्हा जावई माझ्याकडे विहीर खोदणे करीता व घर बांधणे करीता आणखी 5 लाख रूपयाची मागणी करू लागले होते. मुलगी रूपाली हिचे सासरे प्रकाश हे तिला घरामध्ये नेहमी काही ना काही कारणावरून त्रास देत असल्याचे मुलगी आम्हाला सांगत असायची.

त्यानंतर मी, माझा मावस भाऊ भरत त्रिंबक टाळके, बळीराम श्रीरंग सकुंडे, दयानंद दासू काटे असे नायगांव येथे जावई नाना यांचे घरी जावून जावई यांचे भाऊबंद अशांना भेटून 2 ते 3 वेळा मिटींग करून समजावून सांगीतले होते. परंतु त्यांचे वागण्यात काही बदल झाला नाही. मुलगी रूपाली ही तिच्या दोन मुलां मुळे तिचा सासरवास सहन करून संसार करत होती. अशी सर्व हकीगत जेव्हा केव्हा मुलगी रूपाली माझ्या जवळ व तिच्या आई जवळ सांगत होती. की तिचे सासरचे वरील सर्वजण हे तिला सतत त्रास देवून जिवे मारण्याची धमकी देत होते.

तसेच पतीचे दुसरे लग्न लावून देवू असे सतत सांगत होते. दिनांक.19/06/2025 रोजी माझा लहान मुलगा विशाल शिवाजी सकुंडे याचा विवाह असल्याने मोठा मुलगा अंकुश हा मुलगी रूपाली हिला आणयला गेला असता जावई नाना व व्याही प्रकाश हे आमचा व तुमचे काही प्रेमाचे संबंध नाहीत आम्ही लग्नाला येणार नाही व रूपाली व तिच्या मुलांना पाठविणार नाहीत. असे म्हणाले असल्याने मुलगा अंकुश हा तसाच घरी आल्यानंतर त्याने मला रूपाली हिला तिचे पती व सासऱ्यांनी पाठविले नसल्याचे सांगीतले होते. त्यानंतर विवाहाच्या दिवशी मुलगी एकटीच लग्नाला तिचे सोबत जावई व नातलग आले नव्हते.विवाह लागल्यानंतर एक तासात मुलगी रूपाली लग्ना मधून निघून गेली होती. पती 1)नाना प्रकाश उगले, तिचे सासरे 2) प्रकाश पंढरीनाथ उगले रा. नायगांव ता.जामखेड जिल्हा अहिल्यानगर व ननंद3) मनिषा शिवाजी टाळके व तिचे पती 4) शिवाजी गोरख टाळके रा. राळेसांगवी ता. भूम जिल्हा धाराशिव यांचे त्रासाला कंटाळून मुलगी रूपाली नाना उगले वय 25 वर्ष हिने तिचा मुलगा समर्थ नाना उगले वय 6 वर्ष व मुलगीसाक्षी नाना उगले वय 4 वर्ष सर्व रा. नायगांव ता. जामखेड यांचेसह दिनांक. 08/08/2025 रोजी सायंकाळी 5.30 वा चे सुमारास त्यांचे घराजवळील विहीरीमध्ये उडी मारून तिघे मयत झाले असुन तिच्या मृत्युस वरील सर्वजण जबाबदार आहेत म्हणुन माझी वरील इसमाविरूध्द तक्रार आहे. वरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक उज्वल रजपूत करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here