जामखेड प्रतिनिधी
जिल्हातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारी ( दि . २३ ) शेवटच्या दिवशी शिक्षकांच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट आला असून जिल्ह्यातील दिग्गज शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर व शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी चेअरमन संजय धामणे स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या दोघांनी गुरुकुल मंडळाकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. याच वेळी गुरुकुल मंडळाने मोठे शक्तीप्रदर्शनही केले. डॉ. संजय कळमकर यांनी नेवासा सर्वसाधारण मतदार संघातून तर संजय धामणे यांनी नगर तालुका सर्वसाधारण मतदार संघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक बँकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
ADVERTISEMENT

शिक्षक बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज गुरुवारी दि . २३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात इच्छुकांची झुंबड उडाली होती. अशातच गुरुकुल मंडळाने मोठे शक्तीप्रदर्शन करत मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर व संजय धामणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष रा.या. ग. औटी, गुरूकुल मंडळ उच्चाधिकार समिती अध्यक्ष नितीन काकडे, गुरुकुल शिक्षक मंडळ जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, शिक्षक नेते अनिल आंधळे, गुरुकुल महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वृषालीताई कडलग यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाचे तालुकाध्यक्ष, कार्यकारिणी व गुरुकुल महिला आघाडी अध्यक्षा आणि कार्यकारिणी यांच्यासह मंडळाचे समर्थक शिक्षक उपस्थित होते.
जिल्हाभरातून झालेल्या आग्रहामुळे गुरुकुल मंडळाच्या निर्मितीपासून मंडळाचे नेतृत्व करणारे आणि त्यापूर्वी सदिच्छा मंडळात असतानाही बँकेच्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या प्रभावी वकृत्वशैलीने जिल्हा गाजविणारे डॉ. संजय कळमकर हे शिक्षकनेते आहेतच, त्याच बरोबर विनोदी कथाकथनकार व प्रख्यात साहित्यिकही आहेत. त्यांनी अनेक निवडणुकांच्या प्रचार सभा गाजविल्या. परंतु आजपर्यंत शिक्षक बँकेची निवडणूक कधी लढविली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत स्वत : डॉ. कळमकर यांनीच उमेदवारी करावी असा आग्रह जिल्हाभरातील गुरुकुलचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत होते. तसेच डॉ. कळमकर यांच्या जोडीला शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मोठे संघटन कौशल्य असलेले संजय धामणे यांनी ही निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला. या आग्रहाखातर दोघांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे गुरुकुलच्या वतीने सांगण्यात आले. या निर्णयामुळे जिल्हाभरात गुरूकुल मंडळाचे प्रभुत्व वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.