जामखेड न्युज – – – –
दरवर्षी 31 मे रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. त्यातच अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले जामखेड तालुक्यातील चौंडी येथे एकत्रित सामूहीक जयंती अगदी जल्लोषात व उत्साहात साजरी व्हावी या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी सामूहिक जयंती संबंधी नियोजन बैठक घेतली असून या बैठकीत त्यांनी सुयोग्य नियोजनासाठी मार्गदर्शन केले व काही गैरसोय होऊ नये यासाठी देखील सूचना केल्या. यावेळी आमदार रोहित पवार यांनी कर्जत ते चौंडी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून महिना अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती नियोजन बैठकीला संबोधित करत असताना आमदार रोहित पवार यांनी जयंती महोत्सव साजरा करण्यासंदर्भात काही गोष्टी सुचवल्या तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून तमाम नागरिक या जयंती उत्सवात सहभागी होणार असल्याने सर्वंकष विचार करून योग्य ते नियोजन करण्यासंदर्भातील सूचना तेथील उपस्थितांना केल्या. यंदाच्या वर्षी चौंडी येथे महाराष्ट्र राज्याचे विविध विभागाचे विद्यमान मंत्री देखील या जयंती उत्सवात सहभागी होणार असून 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी योग्य ते नियोजन व व्यवस्थापन करण्याची गरज ओळखून यंदा मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवले आहे. याप्रसंगी त्याठिकाणी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, दत्ताभाऊ वारे, सूर्यकांत नाना मोरे, देवा खरात, धनराज कोपनर, अक्षय शिंदे, मधुकर राळेभात, संजय वराट, चौंडीचे सरपंच सतीश उबाळे, देवकर तसेच ग्रा. पं सदस्य व इतरही स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.