जामखेड न्युज – – – –
देशभरासह राज्याच्या हवामानात अचानकपणे अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर-मध्य भारतातील इतर राज्यांमध्ये सध्या उन्हाची दाहकता वाढलेली आहे. मे महिन्यात देखील सूर्य इतकी आग ओकतोयही विशेष बाब आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील ५ दिवस तीव्र उष्णता राहील. उत्तर-मध्य भारतात सरासरी कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही उकाड्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हं नसल्याचं स्कायमेटच्या अहवालातून समोर आलं आहे (Weather Update).
हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तीव्र उन्हाला सुरू आहे. यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश इत्यादी अनेक राज्ये आहेत, जिथे आसनी चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडेल. स्कायमेट वेदरनुसार, शुक्रवारी गुजरात आणि राजस्थान, विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण हरियाणाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
बिहार, झारखंड, ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, तेलंगणाचा काही भाग, कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवत होती. ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असुनही कोणत्याही जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाही. मात्र हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. मान्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचं हवामान खात्याकडून (imd alert) सांगण्यात आलं आहे.