जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता आसाराम गोपाळघरे यांची तर उपसरपंच पदी रंजना श्रीकांत लोखंडे यांची निवड झाली आहे. भाजपाचे सात सदस्य आसतानाही सरपंच पदासाठी सहाच मते मिळाल्याने भाजपाचे एक मत फुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खर्डा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायतमध्ये सतरा सदस्य आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा तर भाजपाचे सात सदस्य निवडून आले होते. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नमिता आसाराम गोपाळघरे तर भाजपा कडुन संजीवनी वैजीनाथ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात नमिता गोपाळघरे यांना आकरा मते मिळाली त्यामुळे त्यांची सरपंच पदी निवड झाली तर संजीवनी पाटील यांना सहा मते मिळाली तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून रंजना श्रीकांत लोखंडे यांना दहा मते तर भाजपा कडुन मदन पांडुरंग गोलेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांना सात मते मिळाली त्यामुळे रंजना लोखंडे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे.
निवडणूक आभासी अधिकारी म्हणून कृषी अधिकारी सुधीर शिंदे तर साहाय्यक म्हणून पी. डी. सातपुते हे होते तर एस एस कुलकर्णी, एन. बी शिंदे, सी एस गाडेकर हे अधिकारी उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच निवडीसाठी तुळशीदास गोपाळघरे व डॉ. अंकुश गोपाळघरे, विजयसिंह गोलेकर, मंजर सय्यद, शिवकुमार गुळवे, महालिंग कोरे, वैभव जामकावळे, दत्तराज पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मागील वेळीही माजी मंत्री प्रा. राम शिंदे यानी
सरपंच पद हे नागोबाची वाडीलाच दिले होते यावेळीही आमदार रोहित पवार यांनीही सरपंच पदाची संधी नागोबाची वाडीलाच दिली आहे. सतरा उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवाराला सरपंच पदाची संधी मिळाली आहे.

सरपंच व उपसरपंच निवडीनंतर बाहेर ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधलण करत जल्लोष साजरा केला.
यावेळी बोलताना तुळशीदास गोपाळघरे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज खर्डा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. पुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली गट तट न ठेवता खर्डा परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहोत.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण व मनोज साखरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.