जामखेड न्युज – – –
कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठान अर्थात ATM आयोजित दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक अशा अहमदनगर शहरातील नंदनवन लॉन्स येथील राजर्षी शाहू महाराज साहित्य नगरी येथे प्रसिद्ध लेखक तथा बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक मा.श्री.किरण केंद्रे यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच रविवार दि.27 फेब्रुवारी 2022रोजी संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आला.राज्यभरातून आलेले विविध उच्चपदस्थ अधिकारी तसेच कृतिशील व प्रतिभावंत शिक्षक बांधवांच्या मांदियाळीसह या ग्रंथदिंडीत तालुक्यातील धोंडपारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक महापुरुषांची अप्रतिम वेशभूषा करत लेझीम पथकाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमात राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक मा.श्री.दिनकर टेमकर ,पूर्वशिक्षणसंचालक मा.डॉ.गोविंद नांदेडे, उपसंचालक मा.डाॅ.नेहा बेलसरे व मा. डाॅ.कमलादेवी आवटे,सामाजिक शास्त्र उपविभागप्रमुख मा.श्री.सचिन चव्हाण, अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.भास्कर पाटील , नागपूरचे शिक्षणाधिकारी मा.श्री.अरूण धामणे , बीडचे शिक्षणाधिकारी मा.श्री.श्रीकांत कुलकर्णी, कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.विक्रम अडसूळ,संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री.नारायण मंगलारम, मावळते संमेलनाध्यक्ष मा.डाॅ.विशाल तायडे, स्वागताध्यक्षा मा.सौ.ज्योती बेलवले इ. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाध्यक्ष मा.श्री.किरण केंद्रे यांच्या हस्ते दत्तवाडी शाळेतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री.मनोहर इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या बीजभाषणातून शिक्षकांचा गौरव करताना शब्दप्रभू डाॅ.गोविंद नांदेडे म्हणाले की ‘शिक्षक हा राष्ट्रनिर्माता असल्याने त्याचे स्थान हे कोणत्याही उच्चपदस्थ अधिका-यापेक्षा सदैव सर्वोच्च असते.त्याचा गौरव करा व त्याच्या पाठीशी उभे राहा . शिक्षक सन्मानाच्या नव्या पर्वास प्रारंभ करूया’.
सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरलेल्या शालेय लेझीम पथकाचे उत्कृष्ट वेशभूषेसह लक्ष्यवेधी व प्रभावी सादरीकरण होण्यासाठी धोंडपारगावचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ उद्योगपती व प्रहार करिअर ॲकेडमी अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. संतोष पवार , प्रहार सैनिक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष मा.श्री.विनोदसिंग परदेशी तसेच प्रशांत कुंभार ,शमीम शेख,लक्ष्मीकांत इडलवार ,ज्ञानेश्वर झगरे ,रोहिणी लोखंडे ,स्पृहा इंदू आदि उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षकबांधवांसह दत्तवाडी शाळेतील सर्व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले .
कला ,क्रीडा व सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धा परीक्षांत सातत्याने घवघवीत यश मिळवत असलेल्या टीम दत्तवाडीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.