जामखेड न्युज – – – –
पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे कर्जत तालुक्यामध्ये चोरटे मुजोर झाले असून त्यांनी चक्क एका पोलीस अधिकार्यांनाच हात दाखवला. पोलीस उपनिरीक्षक यांच्या घरी भर दिवसा धाडसी चोरी करत चोरट्यांनी 3 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
तर दुसर्या घटनेत समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील दीड लाखाचे साहित्य चोरून नेले. एकाच दिवसात चोरट्यांनी 5 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
तालुक्यात दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांचे कोरेगाव या गावाजवळ शेळके पेटकर वस्ती येथे घर आहे.
त्यांच्या कुटुंबातील सर्वजण शेतामध्ये कामासाठी गेले होते. साधारण दुपारी दोन ते साडेचार या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला.
घरामध्ये उचकापाचक करून घरातील 3 लाख 73 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड आणि कागदपत्रे चोरून नेली आहेत. शेळके कुटुंबिय सायंकाळी शेतामधून घरी परतल्यावर हा प्रकार लक्षात आला.
याप्रकरणी अजिनाथ बबन शेळके यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.