जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
कोणतीही गोष्ट जिद्द असेल तर ती शक्य करता येते असे प्रतिपादन राज्याचे नुतन प्राथमिक शिक्षण संचालक श्री.दिनकरराव टेमकर साहेब यांनी केले.राज्याच्या शिक्षण संचालक पदी निवड झाल्याबद्दल लोकमान्य तरुण,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित, नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड यांच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित केला त्यावेळी ते बोलत होते.
पुढे त्यांनी सांगितले कि मी ज्या वेळी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली त्यावेळी फक्त एकच जागा होती पण मी सर्व अभ्यास अगदी मन लावून व जिद्दीने केला त्यामुळे मी आज या पदावर विराजमान आहे.याशिवाय माझे व जामखेडचे एक वेगळे नाते आहे असे त्यांनी संगितले मी या ठिकाणी पूर्वी गटशिक्षणाधिकारी असतानाच माझी वर्ग एक साठी निवड झाली तसेच शाळेविषयी सांगताना पुढे म्हणाले की,मी येथे गटशिक्षणाधिकारी असताना ही शाळा एक छोटेसे रोपटे होते आज बाळसे आलेल्या बाळासारखी गोंडस वाढ झालेली आहे.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी त्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे ,संच मान्यता निकष बदल करावेत अशा मागणीचे निवेदन त्यांनी साहेबांना दिले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.गिरमे साहेब, कोषाध्यक्ष श्री.उमेश काका देशमुख, संचालक सर्व श्री.डॉ.प्रकाश खैरनार, वसंतकाका राळेभात, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख सर, नंदुकाका देशमुख, सुरेंद्रकाका देशपांडे ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.राळेभात मँडम ,ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्री.होशिंग सर तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हजारे सर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.राळेभात मँडम यांनी मानले.
दिनकर टेमकर यांनी सुरुवातीला शिक्षक, मुख्याध्यापक, भोकर (जि. नांदेड), जामखेडला गटशिक्षणाधिकारी, संगमनेर डायट कॉलेजवर अधिव्याख्याता, यवतमाळ, नाशिक व नगरला शिक्षणाधिकारी आणि पुणे विभागात शिक्षण उपसंचालक पदावर काम केले आता ते शिक्षण संचालक आहेत.
प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. नगर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व संघटनांना विश्वासात घेऊन अनेक उपक्रम राबवले. सेमी इंग्रजी, लोकवर्गणीतून डिजिटल स्कूल, शालेय परिसराचा विकास अशा अनेक प्रकल्पांतून त्यांनी जिल्हा परिषद शाळांना नवी ओळख निर्माण करून दिली. राज्यात पटपडताळणीनंतर अनेक जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त होत होते. टेमकर यांनी मात्र वर्षभर अगोदरच पडपडताळणी केल्यामुळे जिल्ह्यात एकही शिक्षक अतिरिक्त शिक्षक होऊ शकला नाही. टेमकर यांच्या कार्यकाळात तत्कालिन उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, उमेश डोंगरे या त्रिमूर्तींनी राबविलेले अनेक शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने स्वीकारले. टेमकर यांची वरिष्ठ पदावर निवड झाल्यामुळे त्यांना काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.









