एसटीचा संप मिटणार; कर्मचारी बोलणी करण्यास तयार

0
198
जामखेड न्युज – – – – 
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका सुरू आहे. या बैठकीत सरकारसोबत बातचीत करून मार्ग काढण्यासाठी एसटी कर्मचारी तयार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. या कर्मचाऱ्यांकडून संपावर मार्ग काढण्यासाठी विचारविनीमय करण्यात येत आहे.
या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातील दोन एसटी कर्मचारी आले होते. या बैठकीत कर्मचाऱ्यांकडून संपाचा तिढा सुटावा म्हणून सरकारसमोर काही मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार हमी, सर्व कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घ्यावे यासोबत शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रद्द करण्यात यावी आणि इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहे.
दुसरीकडे एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट सांगितले आहे. सद्यपरिस्थितीत विलिनीकरण शक्‍य नाही. तसेच न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करु असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सध्या एसटी विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान, तीन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून कर्मचारी संपावर ठाम आहे. अनेक आगारात अजूनही काही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here