जामखेड न्युज – – – – –
वर्धा जिल्ह्यातील सिंदी गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाचे लग्न लागल्यानंतर काही तासांतच त्याला जेलची हवा खावी लागली आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी या आरोपी नवरदेवाला रिसेप्शनच्या मंडपातूनच अटक केली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला जेलमध्ये जावं लागल्याने सिंदी गावात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशांत रमेश खैरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी नवरदेवाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत यानं काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला होता. त्याने पीडितेला नागपूर जिल्ह्यातील कवठा गावातील एका ओळखीतील तरुणाच्या शेतात मालवाहू वाहनातून घेऊन जात, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. हा धक्कादायक प्रकार 27 मे 2021 ते जून महिन्यांपर्यंत सुरू होता.
दरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिली होती. यानंतर तरुणीनं आरोपीकडे लग्नाची मागणी केली. मात्र, आरोपीनं पीडितेला लग्नास नकार देत तिचा गर्भपात घडवला होता. तसेच पीडित तरुणीला अंधारात ठेऊन त्याने परस्पर एका वेगळ्याच मुलीसोबत विवाह केला. या घटनेची माहिती मिळताच तरुणीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात सिंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, फिर्याद दाखल होताच पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीची उचलबांगडी केली.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी या तरुणाला पोलिसांनी लॉकअपमध्ये टाकल्याने सिंदी गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे नातेवाईकांना देखील जबर धक्का बसला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.