जामखेड न्युज – – – –
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत. आज त्यांची पोलीस कोठडी संपणार असून या प्रकरणात पुढची कारवाई होणार आहे. सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आजपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेत नितेश राणे शरण गेले होते.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे सुमारे तीन आठवडे अज्ञातवासात राहून अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. देशातील सर्वोत्तम वकिलांची फौजही त्यासाठी झटत होती. मात्र, पोलिसांकडे असलेले पुरावे आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेता ही लढाई यशस्वी होणार नाही, असे दिसू लागताच नितेश यांनी उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज मागे घेतला़. तसंच ते न्यायालयाला शरणही आले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार
पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळत लावली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता लगेचच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे व संग्राम देसाई यांनी दिली आहे.
नितेश राणेंना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी
नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आज न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली असून त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्यांचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा झाला आहे.
गोव्यात नेऊन नितेश राणेंची चौकशी; पोलिसांचं मौन
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी गुरुवारी गोव्यात नेऊन या गुन्ह्याच्या कटाबाबत चौकशी केली.मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतचा तपशील मिळू शकला नाही. या हल्लाप्रकरणी त्यांच्यावर कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बंधू निलेश राणेंवरही गुन्हा दाखल
धाकटे बंधू नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणारे माजी खासदार निलेश राणे हेही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जमाव जमवल्याचा (कलम १८८) आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी (१८६) निलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात बुधवारी ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक टाळण्याची धडपड आणि शरणागती
नितेश राणे यांनी अटक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही यश न मिळाल्याने राणे सर्वोच्च न्यायालयात गेले़ होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सक्षम न्यायालयात शरण जाण्याची सूचना केली होती. तसे न करता दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने तोही फेटाळला. त्यावर त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती मागे घेऊन नितेश हे बुधवारी कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते.
पाच तास झाली नितेश राणेंची चौकशी
सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आले. कणकवली येथील न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे पोलीस तातडीने तपासाच्या कामाला लागले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार नितेश यांना बुधवारी रात्रीच कणकवलीहून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास राणे यांची चौकशी करण्यात आली.
कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि राकेश परबांची चौकशी सुरू
संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची कसून चौकशी केली जात असून आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आमदार नितेश राणे यांना पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे तर आज राकेश परब यांची ही पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांनाही कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.
“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.





