जामखेड न्युज – – –
कीर्तनकार बंडातात्या यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी फलटणहून साताऱ्यात घेऊन जात आहेत. दुसरीकडे महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरोधात पुण्यात आंदोलनही करण्यात येत आहे.
सातारा: सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत. विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या बंडातात्यांवर सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर टीका होत असून, बंडातात्या यांनी साताऱ्यात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बंडातात्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राज्यातील महिला नेत्यांबद्दलही वादग्रस्त टिप्पणी केली होती. यावरून टीकेची धनी ठरलेल्या बंडातात्यांनी त्यांची माफी मागितली आहे.
ज्या-ज्या व्यक्तींची मी नावे घेतली, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा आकस नाही. मी काही त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने कुणावरही आरोप किंवा टिप्पणी केलेली नाही. अनावधानानं हे वक्तव्य केलं गेलं. त्याबद्दल मी माफी मागत आहे, असे बंडातात्या यांनी सांगितलं. तत्पूर्वी, विनापरवानगी जमाव जमवणे आणि करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी बंडातात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





