जामखेड प्रतिनिधी
शहरातील तपनेश्वर रोड वरील मटका बुकी करणाऱ्या तसेच बाजारतळ भुतवडारोड येथील पाणटपरीवर मावा बनवुन विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल केले. त्यामुळे स्थानिक शहरातील पानटपऱ्यावर खुले आम मावा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जामखेडचा मावा शेजारच्या तीन जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. रोज खुलेआम विक्री होत होती तरी जामखेड पोलीस का दुर्लक्ष करत होते कि काही पोलीसांच्या आशिर्वादाने हे सुरू होते असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जामखेड शहरात मावा विक्री होत आसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील तपनेश्वर रोड वर असलेल्या एका हॉटेल जवळ मटका बुकी करणाऱ्या आरोपी रज्जाक बशिर पठाण रा. जामखेड हा आडोशाला लोकांकडून पैसै घेऊन कल्याण नावाचा मटका हार जीतीचा खेळ खेळताना व खेळवत असताना आढळुन आला. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी मटक्याचे साहीत्य व रोख रक्कम असा एकुण १३८० रुपये जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गणपत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसर्या ठिकाणी याच दिवशी शहरातील बाजारतळ येथील सागर पान सेंटर व भुतवडारोड येथील पान सेंटर या ठिकाणी आरोपी बंटी उर्फ सचिन सोपान डिसले रा. संताजीनगर, जामखेड हा चोरुन लपुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा तसेच हाताच्या सहय्याने मावा तयार करुन विक्री करत आसताना आढळुन आला. त्याच्या कडे झाडाझडती घेतली आसता टपरीच्या आत मध्ये मावा बनवण्याचे साहीत्य असा एकूण १२ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब मुरलीधर कुरूंद, रणजित जाधव ,संभाजी कोतकर व जामखेड पोलीस स्टेशनचे शिवाजी भोस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
शहरातील अनेक टपऱ्या नावालाच पानटपरी म्हणून टपरीवर पानच नसते फक्त गुटखा विक्री सुरू असते. हे राजरोसपणे सुरू असते याला काही पोलीसांचा आशिर्वाद असतो. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. टपरीवर मावा घेताना अस्ताव्यस्त गाड्या लावल्या जातात अनेकदा वाहतुक कोंडी होते. मावा खाऊन कोठेही पिचकारी मारली जाते अनेकदा सर्व सामान्य लोकांना याचा खुपच त्रास होतो. हे पोलीसांना माहित आसतानाही याकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैध धंद्यांविरोधात तालुक्यात कडक पावले उचलली असली तरी शहरातील बस स्टँड, बाजारतळ, बीड रोड, खर्डा चौक, खर्डा रोड व जयहिंद चौक अशा ठिकाणी पानविक्री च्या नावाखाली सुरू आसलेल्या अनेक पानटपऱ्यांवर गुटका व मावा विक्री होत आहे. याठिकाणी देखील स्थानिक पोलीसांनी छापे टाकून कारवाई केली पाहिजे असे देखिल मागणी नागरिकांकडुन होत आहे.