जामखेड प्रतिनिधी
संतांनी घडवलेली व शिवकालाने जोपासलेली आपली मराठी भाषा तेजस्वी आहे. मराठी भाषेचे संवर्धनाची गरज आज निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमाऐवजी आपण मराठी माध्यमातून शिक्षण घेतले पाहिजे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पदवीला मराठी विषय असलेले कितीतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन वर्ग एकचे अधिकारी झालेले आहेत. तेव्हा मराठी माध्यमातून शिक्षणाचा न्यूनगंड काढून टाकावा. मातृभाषेतून विषय आकलन सोपे जाते असे विचार प्रा. मधुकर राळेभात यांनी भाषणात मांडले.

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा पंधरवाडा निमित्ताने ‘मराठीचे महत्त्व व संवर्धन’ या विषयावर नागेश विद्यालयात स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रा. मधुकर राळेभात यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर हे होते. यावेळी जामखेड नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी ही मातृभाषेचे महत्त्व सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक प्रा.आ. य. पवार यांनी उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन कुंडल राळेभात यांनी केले. प्रा. प्रकाश तांबे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विद्या काशिद, प्रा.सखाराम सप्रे, प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्रा. मोहन डुचे , डॉ.जतीन काजळे, रमेश बोलभट आदी मान्यवर उपस्थित होते.