जामखेड न्युज – – – –
सार्वजनिक वाहतूक सेवेतील सर्वाधिक लांबलेल्या एसटी संपाला गुरुवारी तीन महिने पूर्ण झाले. तीन महिन्यांनंतर २७ हजार संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. या कर्मचाऱ्यांसह खासगी चालकांच्या मदतीने गुरुवारी राज्यभरात एकूण आठ हजारांहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या; तसेच २५० पैकी २४० आगार चालू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
गुरुवारपर्यंत महामंडळात संपकरी कर्मचाऱ्यांपैकी २७,१२७ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. या कालावधीत एकूण ६,१५६ कर्मचारी बडतर्फ झाले असून ११,०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबई विभागातून १९४ फेऱ्या धावल्या असून एकूण राज्यभरात एकूण ८,०३० फेऱ्या मार्गस्थ झाल्या आहेत. २५० आगरांपैकी २४० आगार कार्यान्वित झाले आहेत, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
प्रवासी वाऱ्यावर
एसटी फेऱ्या मार्गस्थ झाल्याचा दावा महामंडळाने केला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर एसटी उपलब्ध नाही. यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना खासगी बसने एसटी तिकिटापेक्षा दुप्पट-टिप्पट पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. या खासगी वाहनाच्या तिकीटदरावर कुणाचेही यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.