जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
खादी आणि ग्रामोद्योग आयोग व कर्जत जामखेड एकात्मिक संस्थेच्या वतीने जामखेडमधील बचत गटांच्या महिलांसाठी ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ दहा दिवसीय अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या शिबिराचा व जनजागृती कार्यक्रमाचा आज आ. रोहित (दादा) पवार व सौ. सुनंदा ताई पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमात महिलांना आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते अगरबत्ती बनविणाऱ्या मशीनचे वाटप देखील करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमास प्रधान मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे अधिकारी मा. पियुष कुमार, खादी अगरबत्ती मिशनचे इंचार्ज मा.प्रताप शिंदे व मा.अरुण कुमार यादव, खादी ग्रामोद्योगचे सहसंचालक मा. श्रीराम सुरेश, जामखेडचे गटविकास अधिकारी डॉ.पोळ, जामखेडचे तहसिलदार मा. चंदरे, माविमचे मा.चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी मा. विवेकानंद यादव, तालुका कृषी अधिकारी मा. सुपेकर यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमात आ.रोहित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना त्यांनी कार्यक्रमास उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच स्वतः च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व महिला व पुरुषांसाठी कोणत्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात या बद्दल देखील मार्गदर्शन केले. सौ. सुनंदा ताई पवार यांनी देखील महिलांना या प्रसंगी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी देखील महिलांना सक्षमीकरणासाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व कर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम महिलांसाठी राबविला जात आहे. 20 हजार किंमत असलेले अगरबत्ती बनविण्याचे मशीन इच्छुक महिलांना 10 टक्के स्व योगदानावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना काम मिळावे व त्या माध्यमातून त्यांनी स्वसक्षम व्हावे हा आहे.