मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील; आदित्य ठाकरेंचं भाजपा नेत्यांना उत्तर

0
233
जामखेड न्युज – – – – 
मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. विरोधक रोजच राज्यपालांकडे जातात, त्यात काही नवल नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. विरोधकांनी राजकारणाचा खालचा स्तर गाठला असल्याचंही यावेळी ते एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या हस्ते त्यांच्या वरळी मतदरासंघात अनेक विकासकामांचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर पक्ष ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
“जांबोरी मैदान चांगलं करा अशी मागणी येथील मुलांनी केली होती. त्यानुसार येथे कायापालट केला आहे. याशिवाय गार्डनची, फुटपाथची, सुशोभीकरणाची कामं आम्ही करत आहोत,” अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीत झालेल्या कामांवर रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर ठरेल. पण आम्ही निवडणुक असताना, नसताना काम करत असतो. अनेक शिवसैनिक तर तिकीटाची इच्छा न बाळगता काम करत असतात. जर असे कार्यकर्ते, पक्ष असेल तर जनतेची सेवा २४ तास होतच असते”.
“विरोधक राज्यपालांकडे बसलेले असतात”
विरोधकांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी विचारलं असता ते रोज तिथे बसले असतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन उपयोग नाही. त्यांना लोकं विचारत नाही, इतर ठिकाणी कुठे जाऊन बोंबाबोंब करण्याची संधी नाही. त्यामुळे तिथे जातात आणि निवेदन देतात असा टोला त्यांनी लगावला.
“पण लोकांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री या सर्वांवर जो विश्वास आहे त्याला तडा जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. सर्व्हे पाहिला तर टॉपमध्ये येणं खूप कठीण गोष्ट आहे. अशावेळी विरोधी पक्ष फक्त रेटून खोटं बोला आणि लोकांना भरकटवा एवढंच काम करत आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
“मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार”
“मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. पण आम्हीच ओमायक्रॉनमुळे काळजी घेत आहोत. विरोधी पक्ष जे काही गलिच्छ राजकारण करत आहेत त्यावर फार काही बोलायचं नाही. ते कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात. आम्ही काही त्यांच्या तोंडी लागणार नाही,” असं आदित्या ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here