जामखेड न्युज – – – –
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमधील कोरोना रुग्यसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशावेळी आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 18 हजाराच्या पुढे गेलाय. तर साडे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या कोरोना आकडेवारीमुळे राज्यातील कोरोना स्थिती आता चिंताजनक बनल्याचं पाहायला मिळत आहे._
कोरोनाबाधितांची संख्या 66 हजारांवर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
आज एकट्या मुंबईत 10 हजार 860 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर पुण्यात 1104 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमध्ये 350, रायगड जिल्ह्यात 702 नवे रुग्ण वाढले असून पनवेल शहरात सर्वाधिक 521 रुग्णांची नोंद झालीये. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. नवी मुंबईत एका दिवसात 1072 कोरोना रुग्ण वाढलेत. गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 422 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्यात ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण
_राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे._
मुंबईत कोरोनाचा कहर
मुंबई रुग्णवाढीचा वेग आता पाचव्या गिअरमध्ये असल्याचं आजच्या आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. मुंबईत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहे. तर 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. 47 हजार 476 सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.