जामखेड प्रतिनिधी
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्था संचलित साकत फाटा, बीड रोड जामखेड येथील नवज्योत प्रकल्पातील वयोवृद्ध व मुलांना कुसळंब येथील कार्यसम्राट सरपंच संतोष पवार व कैलास नेटके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किराणा माल आणि वाॅटर हिटर देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्यात आली. यावेळी त्यांचे प्रकल्पातील वृद्ध महिलांनी औक्षण केले व संस्थेच्या वतीने सत्कार केला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असिफ शेख, अभिजित राळेभात, संतोष गव्हाळे, राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व संस्थेचे माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
संतोष गर्जे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून त्यातीलच एक भाग म्हणून हा प्रकल्प सुरू केला आहे.
राजेंद्र जाधव यांनी बोलताना सांगितले की, संतोष पवार व कैलास नेटके यांनी स्वतः च्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब वयोवृद्ध व मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व जाधव कुटुंबाकडून या निराधारांना एक कट्टा गहू देण्याचे जाहीर केले.
कैलास नेटके यांनी बोलताना सांगितले की, जामखेड तालुक्यात वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरु करून नवज्योत प्रकल्पाची निर्मिती झाली असून याठिकाणी गोरगरिबांना आश्रय उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी आपल्या घासातील देऊन या प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन केले.
संतोष पवार यांनी बोलताना सांगितले की तालुक्यातील सर्वच सरपंचांनी आपण प्रत्येक गावचा प्रमुख म्हणून जी जबाबदारी पार पाडत आहोत त्यातीलच एक भाग म्हणून आपण अनाथ, निराधार मुले तसेच वृद्धांना मदत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व नवज्योत प्रकल्पाच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला त्याबद्दल आभार मानले. फुल ना फुलाची पाकळी म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने हि मदत केली असून पुढील काळात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. नवज्योत प्रकल्पातील सोई सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार बापूसाहेब गायकवाड यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास शिवनाथ शिंदे, तुषार शिरोळे, प्रमोद गव्हाळे, विक्रांत डाडर, गणेश गोंडे, गजानन हुलगुंडे, अल्ताब सय्यद, गणेश पावसे, महादेव आजबे, उमेश खुपसे, आदित्य कसबे, आप्पा क्षिरसागर, पवळ भाऊ आदींसह नवज्योत प्रकल्पातील वृद्ध व मुले उपस्थित होते.