जामखेड न्युज – – – –
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक भयानक घटना घडली आहे. तालुक्यातील मोढा फाट्याजवळ बुधवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, तालुक्यातील मोढा फाट्याजवळ घाटशेंद्रा येथून लग्न लावून मंगरुळकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप टेम्पोने रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो मधील 6 वऱ्हाडिंचा जागीच मृत्यू झाला तर 14 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाची नावे अशी, जिजाबाई गणपत खेळवणे वय 60 वर्ष, संजय संपत खेळवणे वय 42 वर्ष, संगीता रतन खेळवणे वय 32 वर्ष, लक्ष्मीबाई अशोक खेळवणे वय 45 वर्ष,अशोक संपत खेळवणे वय 52 वर्ष ,रंजनाबाई संजय खेळवणे वय 40 वर्ष सर्व रा.मंगरूळ ता सिल्लोड जि औरंगाबाद अशी मृतांची नावे आहेत.
तर अपघातात गंभीर जखमींची नावे, कासाबाई भास्कर खेळवणे वय 40 वर्ष, अजिनाथ शेषराव खेळवणे वय 45, आकाश रमेश बोर्डे वय 18, ऋषिकेश गोविंदराव आरके वय 20, संतोष गणपत खेळवणे वय 30, धुलाबाई नारायण बोर्डे वय 50, दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे वय 45, सुलोचना आत्माराम खेळवणे वय 55 ,गणेश सुखदेव बोर्डे वय 19 वर्ष, सार्थक अजिनाथ खेळवणे वय 8 वर्ष, ओमकार रतन खेळवणे वय 16, कलाबाई बाबू म्हस्के वय 50 वर्ष, सुभाष राजेश खेळवणे वय 45, आणि सुरेश विठल खेळवणे वय 50 वर्ष सर्व रा. मंगरूळ हे प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
माहितीनुसार, मंगरूळ येथील शिवराम मुकुंदा खेळवणे यांचा बुधवारी घाटशेंद्रा येथे विवाह होता. हा विवाह समारंभ आटोपून वऱ्हाडी मंडळी परत मंगरूळ दिशेने येत होते. मात्र पिकअप चालकाचे झोपेच्या नादात वाहणावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप हा रस्त्याच्या कडेला ऊस भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकला. अपघात इतका भीषण होता की पिकअपचे तुकडे तुकडे झाले.