जामखेड न्युज – – – – –
विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप अद्यापही मिटलेला नाही. शहर, तालुक्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांचेही हाल होत आहेत गेले दोन महिने उलटूनही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात एसटी धावू शकलेल्या नाहीत. एसटी चालवण्यासाठी आता वाहन परीक्षकांवरच चालकाची जबाबदारी देण्याचा विचार महामंडळाकडून सुरू असल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कारवाई सुरुच
वाहन परीक्षकांवर वाहन तपासणीची जबाबदारी असते. कुठल्या मार्गावर कोणत्या व किती गाडय़ा सोडायच्या तसेच वाहनाची तपासणी इत्यादी जबाबदारी त्यांच्यावर असते. एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुरुच असून मंगळवारी १४८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५६३ झाली आहे.
प्रवाशांचेही हाल होत आहेत
प्रवाशांचे हाल काही प्रमाणात थांबवण्यासाठी कर्तव्यावर पुन्हा रुजू झालेल्या वाहन परीक्षकांवरच चालक म्हणून जबाबदारी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतावे यासाठी कारवाया मागे घेण्याचा निर्णय घेऊन तीन दिवसांची मुदतही दिली. कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अशा कारवायांबरोबरच बदल्याही करण्यात आल्या. परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी राज्यात फारशा एसटी धावू शकल्या नाहीत. २५० पैकी आतापर्यंत ९२ आगार बंद आहेत. तर १५८ आगार अंशत: सुरू आहेत. त्यामुळे एसटीच्या तीन ते साडे तीन हजार फेऱ्याच होतात. परिणामी शहर, तालुक्याबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांचेही हाल होत आहेत.
वाहन परीक्षकांवर चालक म्हणून जबाबदारी
चालक म्हणून पंधरा ते वीस वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना वाहन परीक्षक म्हणून बढती दिली जाते. राज्यातील २५० पैकी प्रत्येक आगारात दोन वाहन परीक्षक असतात. त्यामुळे त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा बॅच, परवाना असतो. ज्या भागात सध्या एसटीची गरज अधिकच आहे, अशा ठिकाणी वाहन परीक्षकांवर चालक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.